बीड : माझी गाडी अडवून घोषणा देणारे मराठा आंदोलनक (Maratha Activist) नव्हते, हा तर प्रायोजित कार्यक्रम होता, असा हल्लाबोल भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केला. त्या एबीपी माझाशी बोलत होत्या. माजलगाव तालुक्यात प्रचारासाठी गेल्यानंतर पंकजा मुंडे यांचा ताफा दोन ठिकाणी मराठा आंदोलकांनी अडवला होता. त्यांच्यासमोर तीव्र घोषणाबाजी करण्यात आली होती. यावरच पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
कालचा प्रकार हा तर प्रायोजित कार्यक्रम
पंकजा मुंडे म्हणाल्या, "मागच्यावेळीही माझा ताफा अडवून अशी घोषणाबाजी करण्यात आली होती. हा प्रकार दुसऱ्यांदा झाल्याने हे मराठा आंदोलक असू शकत नाहीत. कारण आंदोलक हे चर्चा करण्यासाठी तयार असतात. त्यामुळे कालचा प्रकार हा तर प्रायोजित कार्यक्रम होता"
कोणत्याही समाजाला एकमेकांच्या अंगावर घालणाऱ्या कार्यक्रमात मी सहभागी झाले नाही. मी कोणत्याही समाजाचा द्वेष केला नाही. मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण नक्कीच मिळेल, असा शब्द मी मराठा बांधवांना दिला आहे. मात्र हे प्रकार वारंवार घडत असल्याने मी भावूक झाले आहे, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं.
40 उमेदवार, तरीही माझ्याच वाट्याला का?
बीड जिल्ह्यात 40 उमेदवार फिरतात, मग हा अनुभव माझ्याच वाट्याला का? असा प्रश्न विचारत, हे पाहून मन छिन्न विच्छिन्न होत आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. "बीड जिल्ह्याचे सोशल फॅब्रिक जीर्ण करण्याचं मोठं षडयंत्र कोण रचतं हे माहीत नाही. मात्र यापूर्वी बीड जिल्ह्यात असं कधीच झालं नव्हतं. बीड जिल्ह्यामध्ये 40 उमेदवार फिरतात. मग आरक्षणाच्या मागणीवरून हे अनुभव माझ्याच वाट्याला का येतात? मी कोणत्याच घटनेचा फायदा घेऊन कोणत्याही समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न केला नाही. जेव्हा आरक्षणाच्या मुद्द्यावरून माझा ताफा अडवला जातो, त्यामध्ये 14,15 वर्षाची मुलं असतात हे पाहूनदेखील मन भावूक होतं. मुलांमध्ये जातीपातीची लढाई निर्माण करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मराठा समाजाला आरक्षण नक्की मिळेल आणि बीड जिल्ह्यामध्ये जे काही प्रकार सुरू आहेत, त्याचा मतावर जास्त परिणाम होणार नाही, राजकारणी म्हणून आम्ही त्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत, असंदेखील पंकजा मुंडे म्हणाल्या
मनोज जरांगेंच्या आंदोलनावर भाष्य
आरक्षणाच्या मुद्द्यावरून बीड जिल्ह्यामध्ये ज्या काही घटना घडत आहेत, त्याचा काही राजकीय पक्ष फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी गरीब मराठा बांधवांसाठी उभा केलेल्या आंदोलनावर आमचाच हक्क आहे असं काही राजकीय पक्षांना वाटतं. मात्र आपल्या आंदोलनाचा असा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी त्यांनी सावध भूमिका घ्यायला हवी, ज्या जिल्ह्यामध्ये आरक्षणाचं आंदोलन सुरू झालं, तो जिल्हा शांत आहे. मात्र हे सगळं बीड जिल्ह्यामध्येच का होत आहे असा देखील प्रश्न आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
हेही वाचा :
मोठी बातमी : मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवला, मराठा बांधवांना न्याय देण्याची मागणी
मी रडून मत मागत नाही, मला शेवटची संधी द्या, सर्वांसमोर पदर पसरते : पंकजा मुंडे
मनोज जरांगेंवर टीका केली नाही, केली तर शब्द मागे घेत नाही, मी गोपनाथ मुंडेंची औलाद : पंकजा मुंडे