मुंबई : बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राजकारण चांगलच तापलं असून आता नेतेमंडळींकडून एकमेकांवर गंभीर आरोप होत आहेत. त्यातच, विधानसभा सदस्य म्हणजेच आमदारांच्या भाषेचा स्तर खालावल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार सुरेश धस यांच्याकडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आलं असून धनंजय मुंडेंना मोठे आका म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आज माध्यमांसमोर सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या 2 दिवसांपूर्वी धस यांनी वाल्मिक कराडशी फोनवरुन संपर्क केल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे. एकीकडे धस विरुद्ध मिटकरी असा सामना रंगला असताना, ट्विटरवरुन मिटकरी विरुद्ध क्षीरसागर यांच्यात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार संदीप क्षीरसागर (Sandip kshirsagar) यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतान आमदार मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांना चक्क कलंक्या असे म्हटलं आहे.
संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करुन त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात सहभागी झालेल्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री धनंजय मुंडेंना लक्ष्य केल्याचं दिसून आलं. तसेच, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही केली होती. त्यावेळी, अजित पवार हे मराठा नावाल कलंक असल्याची टीकाही एका नेत्यानं केली होती. त्यानंतर, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या कार्यालयीन ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भाने एक ट्विट करण्यात आलंय. आता, आमदार मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्विटला उत्तर दिलं आहे.
जो स्वतःच्या काकाचा मान ठेवत नाही, तो जनतेचा काय मान ठेवील? मराठा नावाला कलंक.! स्वयंघोषित दादा.! अशा आशयाचे ट्विट आमदार क्षीरसागर यांच्या कार्यालयीन अकाऊंटवरुन करण्यात आले होते. त्याला उत्तर देताना आमदार मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांना कलंक्या म्हटलं आहे. ''कशाला अक्कल पाजळतोस? तुझ्या वडिलांबद्दल तुझी वागणूक अख्ख्या देशाने बघीतली आहे. तू तर मानव जातीला कलंक आहेस. आपली लायकी पाहून वागत जा. मराठा व इतर सर्व बहुजन समाजात आई-वडील श्रेष्ठ मानल्या जातात. तू नेता व्हायच्या लायकीचा आहेस का, आरशात बघ जरा #कलंक्या'', अशा शब्दात मिटकरी यांनी संदीप क्षीरसागर यांच्याकडून झालेल्या टीकेवर पलटवार केला आहे. त्यामुळे, संतोष देशमुख प्रकरणावरुन आमदार मिटकरी व संदीप क्षीरसागर यांच्यातच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा
सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; अमोल मिटकरींचे गंभीर आरोप