बीड: धनंजय मुंडेंना संपवून त्यांच्याजागी आमदारकीचे स्वप्न वाल्मिक कराड (Walmik karad) पाहात असल्याचा दावा करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी आणखी एक खळबळजनक दावा केला आहे. गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड (Jitenda Awhad) यांना मारण्यासाठी रेकी केली होती, असे विजयसिंह बांगर म्हटले आहे. विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गित्ते हा मला धमकी देण्याचे काम करतोय, असे आव्हाड यांनी म्हटले होते. वाल्मिक कराड प्रकरणावरुन सध्या बीड (beed) जिल्हा चर्चेत असून महादेव मुंडे हत्याप्रकरणावरुनही कारवाईला वेग आला आहे. विजयसिंह बांगर यांनी महादेव मुंडे हत्याप्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलाचा हात असल्याचे सांगत काही पुरावे देखील समोर आणले होते. त्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांनीही याप्रकरणात लक्ष घातल्यानंतर पोलीस कारवाईला वेग आला.
बीडमधील महादेव मुंडे हत्याप्रकरणात सध्या पोलिसांकडून गोट्या गित्तेचा शोध घेतला जात आहे. मात्र, तो फरार आहे. शनिवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. गोट्याने 16 जानेवारीचा जुना व्हिडीओ पोस्ट केल्याचे समजते. परळी जवळील मालेवाडी परिसरातील रेल्वे पटरीवरचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडीओत गोट्या गित्ते याने वाल्मिक कराड हा आपले दैवत असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर, विजयसिंह बांगर यांनी पत्रकार परिषद घेत गोट्या गित्तेने मुंबईत रेकी केल्याचा दावा केला आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे, गोट्या गित्ते हा सायको किलर विकृत मानसिकतेचा गुन्हेगार आहे. परळीतील बहुतांश हत्याकांडात त्याचा हात असून महादेव मुंडे यांच्या हत्याकांडात तो संशयित आहे. मात्र, परळी पोलिसांनी त्याला अद्याप अटक केलेली नाही. बीड आणि परळी पोलिसांनी तात्काळ गोट्या गित्तेला अटक केली पाहिजे. कारण, व्हिडिओ व्हायरल करून लोकप्रतिनिधीना हा धमकावत आहे, असे विजयसिंह बांगर यांनी म्हटले.
वाल्मिक कराडच्या भक्तांची किर्तन ऐकण्याची वेळ सर्वसामान्य जनता आणि पोलिसांवर आली आहे. पंकज कुमावत एसआयटी प्रमुख आहेत, अपेक्षा आहे ते वाल्मिक कराडच्या मुलाला आणि गोट्या गित्तेला अटक करतील. सर्वसामान्य जनतेत गोट्या गीतेची दहशत आहे, आता एखाद्या लोकप्रतिनिधी अथवा अधिकाऱ्याची हत्या करण्याची वाट पाहायची का? असा सवाल देखील बांगर यांनी उपस्थित केला. तसेच, गोट्या गित्ते आणि तांदळे नामक युवकाने मुंबईत जाऊन जितेंद्र आव्हाड यांना मारण्यासाठी रेकी केली होती. त्यामुळे तांदळे आणि गित्ते सराईत गुन्हेगारावर बीड पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी बांगर यांच्याकडून आज पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले,मला धमकी
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून गोट्या गित्ते हा मला धमकी देण्याचे काम करतोय. वाल्मिक कराडचा उजवा हात म्हणून तो ओळखला जातो. बापू आंधळे खून प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. इन्स्पेक्टर महाजन याने गित्तेलाही वाचवण्याचे काम केले आहे. गित्ते हा नामचीन गुंड आहे, मी त्याला घाबरणार मी नाही. महादेव मुंडे याच्या खून प्रकरणात देखील मुख्य सूत्रधार तोच होता, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यानंतर, बांगर यांनी ही माहिती दिली.
हेही वाचा
सेल्फी अन् रिल्ससाठी जीवघेणा स्टंट, सज्जनगडावरील कड्यांवर उभे राहून पर्यटकांचे फोटोशूट