Dattatray Bharne Viral Video : इंदापूर : लोकसभा निवडणुकीचं (Lok Sabha Election 2024) बिगुल वाजलं तेव्हापासूनच बारामती लोकसभा मतदारसंघ (Baramati Lok Sabha Constituency) विशेष चर्चेत होता. नणंद-भावजय लढतीमुळे संपूर्ण राज्याचंच नाहीतर देशाचंही लक्ष या मतदारसंघाकडे लागलं आहे. आज बारामतीत लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय. अशातच मतदान प्रक्रिया सुरू असतानाच एका व्हिडीओनं प्रचंड धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ म्हणजे, आमदार दत्तात्रय भरणे यांच्या व्हायरल व्हिडीओ. इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ केलेला व्हिडीओ समोर आला आहे. इंदापूरमधील हा व्हिडीओ असून यामध्ये दत्तात्रय भरणे यात शिवीगाळ करत असल्याचं दिसत आहे. सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते नाना गवळी यांना दत्तात्रय भरणेंनी शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओ रोहित पवार यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला आणि संपूर्ण राज्यभरात चर्चांना उधाण आलं. 


आमदार दत्तात्रय भरणेंनी सुप्रिया सुळेंचे कार्यकर्ते नाना गवळींना शिवीगाळ केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर सुप्रिया सुळेंनी नाना गवळींची भेट घेतली. त्यावेळी गवळींनी घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तसेच, यावेळी त्यांदा कंठही दाटला. त्यांना रडू आवरलं नाही. दत्तात्रय भरणेंनी शिवीगाळ केलेला प्रसंग सांगताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. 


आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही : रोहित पवार 


आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलंय की, "केवळ दडपशाहीपुढं न झुकता स्वाभिमानाने बुथवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना अजितदादा मित्र मंडळाचे सदस्य, माजी मंत्री आणि इंदापूरचे आमदार हे कशा अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतात आणि धमकी देतात ते या व्हिडीओत बघा. विशेष म्हणजे, ज्यांच्याशी ते असं वागतात ही त्यांचीच भावकी आणि बारा बलुतेदारांपैकी एक आहे. ही चिडचिड खूप काही सांगून जाते. पण आजच्या लढाईत स्वाभिमानी कार्यकर्ता आणि मतदार कोणत्याही धमक्यांना आणि दपडशाहीला भीक घालणार नाही."


पाहा व्हिडीओ : Dattatray Bharne Viral Video : दत्तात्रय भरणेंकडून शिवीगाळ; नाना गवळींना अश्रू अनावर