बारामती: गेल्या काही दिवसांमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातील सदस्यांमधील संघर्ष अधिकाअधिक तीव्र होताना दिसत आहे. अजितदादा गट आणि शरद पवार गटाकडून आता एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका-प्रतिटीका होताना दिसत आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी अलीकडेच  'ओरिजनल पवार' कोण असा मुद्दा उपस्थित करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, राजकारणाचा दीर्घ अनुभव असलेल्या मुरब्बी शरद पवार (Sharad Pawar) यांनी अजित पवार यांचा हा डाव त्यांच्यावरच उलटवला होता. त्यानंतर आता रोहित पवार यांनी या वादात उडी घेतली आहे. रोहित पवार यांनीही थेट अजित पवार यांना थेट लक्ष्य केले आहे. ते शनिवारी बारामतीमधील सुप्यात बोलत होते.


यावेळी रोहित पवार यांनी बारामतीमध्ये आजपर्यंत चालत आलेल्या राजकीय कराराचा उल्लेख केला.  बारामतीमध्ये भावाने बहिणीला शब्द दिला होता, मी राजकीय यंत्रणा बघतो, तू तिकडे प्रश्न मांडायचे आणि काम करुन घ्यायचे ठरले होते. तुमच्या घरात राखी पौर्णिमा होते का आमच्या घरात होते. भावानं बहिणीला शब्द दिला तर तो पाळायचा असतो. भावाने शब्द दिला होता राजकीय यंत्रणा मी बघतो आणि भावाने जर वेगळी भूमिका घेतली तर ताई चुकली आहे का?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. 


भाजपने कुटुंब फोडल्याची गोष्ट लोकांना आवडलेली नाही: रोहित पवार 


रोहित पवार यांनी आपल्या भाषणात भाजपला लक्ष्य केले. जर भाजपची खऱ्या अर्थाने ताकद असतील तर ते लोकंच्या मागे लागले असते का? त्यांना या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या असत्या का? भाजपमध्ये अहंकार ठासून भरला आहे, त्यामुळे त्यांचे वाटोळे झाले. पूर्वी राष्ट्रवादीच्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटांची वेळ दिसत होती, पण भाजपच्या नादी लागून आता त्यांचे बारा वाजले आहेत. भाजपने कुटुंब फोडल्याची बाब लोकांना आवडलेली नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले. 


सुप्रिया सुळे बारामतीमधून 3 लाखांच्या लीडने निवडून येतील: रोहित पवार


मी बारामतीमध्ये सकाळपासून दौरा करत आहे. लोक म्हणतात काही काळजी करू नका, साहेबांना राज्याचा दौरा करायला सांगा. आम्ही आहोत इथे, सुप्रिया सुळेंना तीन लाखांनी निवडून देऊ. पहिल्यांदा वडिलांना निवडून दिलं, परत मुलाला दिलं, पवार साहेबांना आमच्यासाठी वडिलांच्या स्थानी आहेत. 


बीजेपीच्या नादी लागून तुम्ही वडिलांना सोडलं, हीच गोष्ट सर्व सामान्य लोकांना आवडली नाही. जे वक्तव्य करतात ते लोकांना अजिबात पटत नाही. जसजसे अजित पवार बोलतील, तसतसे सुप्रिया सुळे यांना लीड मिळेल, असा दावा रोहित पवार यांनी केला.


मी पहिल्यापासून भाजपच्या विरोधात लढतो आहे. कोणाच्या डोळ्यात पाणी आलं त्यापेक्षा भाजपाला हद्दपार करायचे आहे. भाजपचे लोक इथे येतात आणि सांगतात की साहेबांना आम्हाला राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे. साहेबांना अडचणीत आणण्याचा भाजपचा डाव आहे. इथल्या लोकांना हे कळालं आहे. ही लढाई साहेब विरुद्ध भाजप आहे. लोक भाजपाला हद्दपार करतील, असे रोहित पवार यांनी सांगितले. 


आणखी वाचा


हाती तुतारी घ्या, नाहीतर पिपाणी, काही फरक पडणार नाही; धैर्यशील मोहिते पाटलांवर अजित पवार गटाचा निशाणा