पुणे: राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक नेते पक्षातंर करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. अशातच इंदापूरचे भाजप नेते हर्षवर्धन पाटील भाजपची साथ सोडून तुतारी फुंकणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता राजकारणात सुरू असलेलं बॅनर वॉर चांगलंच चर्चेत आलं आहे. इंदापूरमध्ये शरद पवार (Sharad Pawar) आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे बॅनर झळकले आहेत. त्यावर इंदापूर तालुक्याची झाली तयारी .....हर्षवर्धनभाऊ तुम्ही आता वाजवा तुतारी.... असं लिहण्यात आलं आहे. 


आज इंदापूरच्या आठवडे बाजार आहे. ऐन बाजारात आज एक फ्लेक्स भर चौकात लागला आहे, तो सध्या सर्व नागरिकांचं लक्ष्य वेधून घेत आहे. त्याचबरोबर चर्चेचा विषय ठरत आहे.  त्यावर शरद पवार (Sharad Pawar) आणि हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांचे फोटो आहेत. तर मजकूर अचंबित करत होता. कारण कालच पाटील यांनी गिरीश महाजन यांच्या गणपतीच्या दर्शनाचे वेळी तुतारी ही फक्त माध्यमातच आहे. आम्ही आहे तिथेच आहोत, असे सांगितले.  तर आज इंदारपुरात लागलेला हा बॅनर वेगळ्या वळणावर असल्याचे दिसत आहे.


हर्षवर्धन पाटील भाजप सोडणार नसल्याचं गिरीश महाजन यांनी केलं स्पष्ट


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हर्षवर्धन पाटील भाजप सोडून राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षात जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांच्या जाण्याबाबतच्या चर्चांवर भाजपाचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) तुतारी हाती घेणार आहेत या अफवा आहेत. एका साखर कारखान्याच्या बैठकीच्या संदर्भात ते पुण्याला एकत्र भेटले होते. त्यांच्यावर केंद्राची सहकार खात्याच्या संदर्भातली साखर कारखान्यांची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांना जाणं अपरिहार्य होतं. ते भेटले, बोलले याचा अर्थ ते त्यांच्या पक्षात चालले असं समजण्याचं कारण नाही”, असं गिरीश महाजन म्हणाले.


"अनेक कार्यक्रमांमध्ये नेते एकमेकांना भेटतो. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही तुतारी हाती घेतली किंवा मशाल हातात घेतली. हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आमच्यासोबतच भाजपसोबतच आहेत. त्यांच्या मतदारसंघाबाबतच्या नक्कीच काही अडचणी आहेत. पण त्या सोडवल्या जातील. देवेंद्र फडणवीस स्वत: त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याशी बोलत आहेत. हर्षवर्धन पाटील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. त्यामुळे मला वाटतं की या सगळ्या अफवा आहेत”, असं गिरीश महाजन यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.