Raj Thackeray on Flexible Politics: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आगामी काळात राजकारणात 'लवचिक' धोरण अवलंबिण्याचे सूतोवाच केल्यानंतर तर्कवितर्कांना उधाण आले आहे. राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याबद्दल अनेक अंदाज लावले आहेत. राज ठाकरे आगामी काळात एखादा मोठा राजकीय निर्णय घेणार का, असा प्रश्नही अनेकांना पडला होता. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी सेना, मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरे यांच्यापासून सोबत असणाऱ्या बाळा नांदगावकर यांनी याबाबत भाष्य केले आहे. पक्षाच्या आणि मराठी माणसाच्या हितासाठी लवचिकता दाखवावी लागते, ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊनच राज ठाकरे पुढे जात आहेत, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले. मात्र, ही राजकीय लवचिकता म्हणजे काय आहे, हे सांगण्यास मात्र नांदगावकरांनी नकार दिला. ते शुक्रवारी शिवतीर्थावर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आदरांजली वाहण्यासाठी आले असताना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Continues below advertisement

आपण बाळासाहेबांची शिकवण घेऊन पुढे गेले पाहिजे. काहीवेळेला परिणामांची पर्वा न करता आपल्याला एकजुटीने वाटचाल करणे गरजेचे आहे. कोणताही निर्णय घेताना हा निर्णय बाळासाहेब ठाकरे यांना आवडला असता की नाही, हे विचार करुन आपण कृती केली पाहिजे. बाळासाहेब ठाकरे यांनीही मुरली देवरा यांना महापौर होण्यासाठी मदत केली होती. ते कठोर असले तरी वेळेप्रसंगी मवाळ भूमिका घ्यायचे. बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका ही पक्षहिताची आणि मराठी माणसाच्या हिताची असायची. आम्ही कार सेवेला गेलो होतो तेव्हा बाबरी मशीद पडल्यानंतर भाजपच्या लोकांनी हात वर केले. तेव्हा सुंदरलाल भंडारी यांनी, आमच्यापैकी कोणीही तिकडे नव्हते, शिवसैनिक असतील, असे त्यांनी म्हटले होते. त्यावेळी बाळासाहेबांनी, बाबरी मशीद पाडणारा शिवसैनिक असेल तर मला गर्व आहे, असे वक्तव्य केले होते. तेव्हा त्यांनी कोणाचीही तमा बाळगली नाही. मराठी माणसाबाबत त्यांनी कोणतीही तडजोड केली नाही. ते म्हणायचे की, मी महाराष्ट्रात मराठी आहे आणि देशात हिंदू आहे, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले. 

मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो तेव्हा लवचिकता ही दाखवावी लागते. तीच भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघे मिळून मराठी माणसाच्या हिताचा निर्णय घेतील. आम्ही सगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत असू, असेही बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

Continues below advertisement

Raj Thackeray: राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

बाळासाहेब दूरदर्शी होते. त्यांचा दृष्टिकोन आजही सुसंगत वाटतो आणि भविष्यातही राहील. त्यामुळेच ते कालातीत राहातील. बाळासाहेबांसारखी प्रतिभा परत कधी बघायला मिळणार नाही हे जितकं खरं आहे तितकंच बाळासाहेबांसारखं राजकारण करणं यापुढे कोणालाच जमणार नाही हे देखील खरं आहे.  पण त्यांच्या प्रतिमेला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्यांनी मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी उभारलेला लढा हा मात्र धगधगत राहील, हे पाहणं बाळासाहेबांच्या पुढच्या पिढ्यांच्या हातात आहे. आणि ते आम्ही नेटाने करू हा आमचा मराठी माणसाला शब्द आहे. 

राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत.  मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे 'बाळासाहेब' आणि 'मराठी' या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा , प्रेम तसूभर पण कमी होणार नाही, असे राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा

मोठी बातमी : बाळासाहेबांसाठी एकनाथ शिंदेंनी दातृत्व दाखवावं, उद्धव ठाकरेंना पाठिंबा द्यावा, भास्कर जाधवांची साद, मुंबईचं गणित बदलणार?