नाशिक : जालन्यातील विभागाय पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी एका आंदोलक शेतकऱ्याला चक्क रस्त्यावर सिनेस्टाईल उडी घेत लाथ मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. पोलीस अधिकाऱ्याचं अशा पद्धतीचं वागणं पाहून नेटीझन्ससह विरोधकांनीही प्रश्न उपस्थित केले. जर भररस्त्यात पोलीस असं वागत असतील तर पोलीस (Police) कोठडीत पोलीस कसं वागत असतील, असा सवालही उपस्थित करण्यात आला. याप्रकरणी आमदार रोहित पवारांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. तसेच, हा विकृतीचा कळस आहे. याची गंभीर दखल घेऊन शासनाने या पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि संबंधित नागरिकालाही न्याय द्यावा', अशी मागणीही त्यांनी केली होती. आता, माजी मंत्री बच्चू कडू (Bachhu kadu) यांनी देखील तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.
जालन्यात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पालकमंत्री पंकजा मुंडे आल्या असता, एका कुटुंबीयाने आपलं गाऱ्हाणं त्यांच्यापुढे मांडण्यासाठी आंदोलन केले. पोलिसांकडून आरोपीला मदत होत असल्याचे सांगत आंदोलक कुटुंबाने पोलिसांविरुद्ध भूमिका मांडली होती. दरम्यान, पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न करत असलेल्या आंदोलक अमित चौधरी यांना डीवायएसी अनंत कुलकर्णी यांनी बुटांसह सिनेस्टाईल लाथ मारली. या घटनेवर आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. आता, आमदार बच्चू कडू यांनी देखील तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.
डीवायएसपीला देखील लाथ मारली पाहिजे, त्या डीवायएसपीच्या ढुंगणावर आम्ही लाथ मारू, असे म्हणत बच्चू कडू यांनी जालन्यातील व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली. मंत्री आला तर मतदारांना लाथ मारणार, निवडणूक आली तर त्याच्या घरापर्यंत जाणार. पंकजा मुंडेंना देखील हे समजायला हवं होतं, पंकजा मुंडेंनी देखील निषेध व्यक्त करायला हवा होता, असे म्हणत पंकजा मुंडेंनाही बच्चू कडूंनी टोला लगावला. जगाच्या पाठीवर हुशार असलेले आमचे मुख्यमंत्री ते स्वतः गृहमंत्री देखील आहेत, त्यांचे पोलीस असे वागत असेल तर... पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईने काही होणार नाही, त्या शेतकऱ्याकडून त्या डीवायएसपीच्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे, अशा शब्दात बच्चू कडूंनी आपला संताप व्यक्त केला.
भाजपच्या कार्यालयातच मतदान केंद्र करावे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढावं की नाही लढावं हाच विचार करतोय. मला वाटतं भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झालं पाहिजे, मतदान केंद्र सर्व संपवले पाहिजे. भाजपच्या कार्यालयामध्येच मतपेट्या ठेवून त्यांनीच बटण दाबावं आणि आगामी निवडणुकांमध्ये नगरसेवक निवडून आणावे, कशाला निवडणुकीचा खर्च करत बसता, असे म्हणत निवडणुका आणि मतांच्या चोरीवरुन भाजपला बच्चू कडूंनी लक्ष्य केलं. माझ्या मतदारसंघात 13 हजार नावे डबल सापडली आहेत. लोकशाहीचं पतन करण्याचं काम जर सुरू असेल तर आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र देणार आहोत. सरकारी शाळांमध्ये मतदान केंद्र न ठेवता भाजपच्या कार्यालयांमध्ये मतदान केंद्र ठेवावं, अशी मागणी करणार असल्याचंही कडू यांनी म्हटले.
एकनाथ शिंदेंना लॉटरी लावली कोणी?
बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील वादग्रस्त वक्तव्यावरही भाष्य केलं. शिंदे साहेबांना लॉटरी लावली कोणी, लावून दिली कोणी. सामान्य माणसाला थोडी लॉटरी लागते, लॉटरी इथे फक्त मंत्र्यांना आणि उद्योगपती यांनाच लागते. मात्र, लॉटरी लावली कोणी हे गणेश नाईकांना माहिती आहे, असे म्हणत बच्चू कडूंनी गणेश नाईकांच्या भाजपकडेच बोट दाखवले आहे.
हेही वाचा
अण्णा, आता तरी उठा, मतांची चोरी झालीय; पुण्यात अण्णा हजारेंच्या फोटोसह झळकले बॅनर