मुंबई :  अजित पवारांच्या (Ajit Pawar)  राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कूपर रुग्णालयात झीशान सिद्दीकींसह कुटुंबीयांचं सांत्वन करण्यात आले.  हरहुन्नरी माणूस हरवला असून बाबा आपल्यात नाही यावर मला अजूनही विश्वास बसत नाही, असे अजित पवार म्हणाले. 


अजित पवार म्हणाले, झिशान सिद्दीकी कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे.   कालच्या हल्ल्याचा निषेध करतो.  पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे.  अशा घटनांबाबत राजकारण करणं चुकीचं आहे.  बाबा सिद्दीकींसोबत अनेक वर्षे काम केलं.  हत्येची घटना निंदनीय आहे.  बाबा सिद्दीकींची हत्या दुर्दैवी आहे.  नियतीच्या पुढे कुणाचंही काही चालत नाही.  आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. 






माझा चांगला सहकारी, मित्र गमावला : अजित पवार


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे, असेही अजित पवार म्हणाले.  


अजित पवारांचे आजचे सर्व दौरे रद्द


बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर अजित पवारांचे आजचे सर्व दौरे रद्द करण्यात आले आहे.  अजित पवार कूपर रुग्णालयात  आहे.  बाबा सिद्दीकींचं पार्थिव सायंकाळी 7 वाजता वांद्र्यातल्या निवासस्थानी आणणार आहे.   मरीन लाईन्स दफनभूमीत बाबा सिद्दीकींवर अंत्यसंस्कार करण्यात येणाार आहे.


हे ही वाचा :


गृहमंत्र्यांची हकालपट्टी करा, बाबा सिद्दिकी प्रकरणावरून राऊतांचे फडणवीसांवर टीकास्त्र, म्हणाले, रात्री हुडी घालून फिरण्यापेक्षा...