ठाणे: देशासह राज्यभरात लोकसभा निवडणूकीची तयारी सुरु आहे. याचदरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) नेते आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक (एल.टी.) मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी काल म्हणजेच 03 मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. 


सदर प्रकरणी अविनाश जाधव यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. यावेळी अविनाश जाधव म्हणाले की, एका व्यक्तीनं दूरध्वनी करुन मला आणि माझ्या पत्नीला डांबून ठेवलंय, असं सांगितलं होतं. त्यानंतर मी मदतीसाठी पोलिसांसह तेथे गेलो होतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सूड भावनेनं आपल्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात येत असल्याचं अविनाश जाधव म्हणाले होते. आता या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. या व्हिडीओमध्ये सराफाच्या मुलाला मारहाण करताना अविनाश जाधव दिसत आहे. 


तक्रारीत काय म्हटलंय?


सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अविनाश जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी सराफाने बोलावले असतना, अविनाश जाधव यांनी तिथे सराफाच्या मुलाला मारहाण केली. तसेच जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. न्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (५५) यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात भादंवि कलम ३८५, १४३, १४७, ३२३, १२० ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला अप्पर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांनी दुजोरा दिलाय. तसंच याप्रकरणी क्रॉस केस घेण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 


नेमकं प्रकरण काय ? 


सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांच्या तक्रारीवरुन अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. तक्रारीनुसार, शैलेश जैन यांनी वैभव ठक्करला झवेरी बाजार येथील जे. के. ज्वेलर्स या कार्यालयात हिशोबासाठी बोलावलं होतं. यावेळी अविनाश जाधव यांनी त्यांचे सहकारी, अंगरक्षक आणि सहा ते सात जणांसह पोलिसांसमक्ष जैन यांचा मुलगा स्वामिल याला मारहाण केली. तसंच अविनाश जाधव यांनी तक्रारदार शैलेश जैन यांना उचलून नेण्याची आणि नुकसान करण्याची धमकी देऊन त्यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावलं, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.