Ashish Shelar On Raj Uddhav Thackeray मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा काल झालेल्या विजयी मेळाव्यावरुन मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली आहे. आमच्या दोघांतील 'अंतरपाट' अनाजी पंतांनी दूर केला. आता अक्षता टाकायची गरज नाही. एकत्र आलो आहे, एकत्र राहण्यासाठी, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं होतं. यावरुन आता आशिष शेलार यांनी देखील प्रत्युत्तर दिलं आहे.
दोन भाऊ एकत्र झाले. दोन कुटुंब एकत्र आली याचा आनंद आहे, असं आशिष शेलार म्हणाले. तसेच दोन पक्ष एकत्र येतील की नाही, हे त्या दोन पक्षांचा निर्णय आहे. परंतु कालचा कार्यक्रम हा मांडलेला इव्हेंट होता. एकाचं भाषण अपूर्ण, एकाचं अप्रासंगिक भाषण झालं. त्रिभाषा सूत्र कोणी आणलं हे त्यांना माहित नाही. देशात कुठे त्रिभाषा सूत्र आहे हे गुगल केलं असतं तर सत्य समजलं असतं, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. उद्धव ठाकरेंचे भाषण अप्रासंगिक आणि राज ठाकरेंचे भाषण अपूर्ण होते. उद्धव ठाकरेंच्या मनात सत्ता गेल्याची सल दिसली. ट ला ट आणि फ ला फ लावू भाषण होतं. अनाजी पंत म्हणजे काय?, आमच्या कडेही नावं आहेत. टोमणे मारणे ही उद्धव ठाकरेंची पद्धत आहे. दोघांच्या भाषणामध्ये प्रामाणिकपणा नव्हता, असा हल्लाबोल आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर केला.
काल भावकीचा खेळ पाहिला- आशिष शेलार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि सरकारने मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला, तेव्हा या दोघांची तोंडं बंद होती. दोघेही राजकीय भूमिका मांडतायत. मराठीशी त्यांना काही देणंघेणं नाही, असं आशिष शेलार म्हणाले. तुमच्या लेकरांनी तीन भाषा शिकाव्यात, पण इतरांच्या मुलांनी ते शिकू नये का?, पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं. पण इथे भाषा विचारून मारतायत, असा निशाणा आशिष शेलार यांनी साधला. काल भावकीचा खेळ पाहिला. कुणी बारामती तर कुणी कळव्यावरून आला होता. थोड्या दिवसांनी घाबरलेल्या मनस्थितीत ईव्हीएम ईव्हीएम ओरडू नका. घाबरलेल्या मनस्थितीत माणसं अंधारात हात पकडून चालतात, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला. इंग्रजीबाबत बोलताना राज ठाकरेंना पोटशूळ उठला, अशी टीकाही आशिष शेलारांनी केली.