Parth Pawar: मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकलानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार हे आता निश्चित झालं आहे. त्यामुळे, महायुतीच्या प्रमुख पक्षांतील प्रमुख नेत्यांच्या गाठीभेटी गेऊन अनेकजण शुभेच्छांचा वर्षावर करत आहेत. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावरही नेत्यांकडून, आमदारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याचवेळी, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी निवडणूक कॅम्पेन करणाऱ्या डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा यांनीही अजित पवारांच्या विजयाबद्दल त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. मात्र, यावेळी त्यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्याने वाद निर्माण झाला आहे. आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) नरेश अरोरा यांना यावरुन चांगलंच सुनावलं असून शेवटी तुम्ही पगारीवरील शिपाई असल्याचा टोलाही लगावला होता. पण, आता मिटकरी-अरोरा वादात थेट अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी उडी घेत अमोल मिटकरींना चांगलंच झापलं आहे. अमोल मिटकरींनी मीडियाला बाईट देऊ नयेत, असा इशारा देखील पार्थ यांनी मिटकरींना दिलाय.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला घवघवीत यश मिळालं. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजप शिंदेंची शिवसेना व अजितदादांच्या राष्ट्रवादीसह नव्याने बनलेल्या महायुतीला मोठं यश मिळालं. लोकसभेत महायुतीला फटका बसल्यानंतर अत्यंत सावध व सतर्क राहून महायुती या निवडणुकीला सामोरी गेली. सरकारची लाडकी बहीण योजना निवडणुकीत 'गेमचेंजर' ठरली. विशेष म्हणजे तिन्ही पक्षांनी लाडक्या बहिणीवरुन मोठं कॅम्पेनिंगही केलं होतं. त्यात, अजित पवारांनी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढला. पक्षातील नेत्यांसह तळागाळातील सामान्य कार्यकत्यांची साथ सोबत घेत महिलांना साद घातली. यावेळी, अजित पवारांच्या मिडिया कॅम्पेनिंगमध्ये नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स कंपनीनेही पीआर एजन्सी म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. अजित पवारांचं गुलाबी कॅम्पेन त्यांच्याच माध्यमातून करण्यात आलं होतं. त्यामुळे, आता विजयानंतर श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरा यांच्यावर टीका करत थेट तुम्ही पगारी शपाई असल्याचं म्हटलं. तर, आज एका वर्तमानपत्रात लेख लिहित यशाचे डिझाईन राष्ट्रवादीचेच असा टोलाही लगावला. आता, त्यावरुन, पार्थ पवार यांनी मिटकरींना चांगलंच झापलं आहे.
काय म्हणाले पार्थ पवार
अमोल मिटकरी हे राष्ट्रवादीचे आमदार असूनही पक्षाच्या भूमिकेविरुद्ध भूमिका घेत आहेत, हे दुर्दैवी आहे. नरेश अरोरा आणि DesignBoxed संदर्भातील त्यांच्या वक्तव्याचा माझा पक्ष आणि माझे वडिल अजिबात समर्थन करत नाहीत. तसेच, मिटकरी यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देऊ नये, अशी भूमिकाही पार्थ यांनी इंग्रजीत ट्विट करुन मांडली आहे. त्यामुळे, पार्थ पवारांनी अमोल मिटकरींना गुलाबी वादळावरुन सुरू झालेल्या वादात चांगलंच सुनावल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत लढवलेल्या 55 पैकी 41 जागांवर यश मिळालं आहे.