Amit Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue Navi Mumbai: नवी मुंबईतील नेरूळ येथे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे (Chhatrapati Shivaji Maharaj Statue Navi Mumbai) गेल्या सहा महिन्यांपासून पालिकेने अनावरण केले नव्हते. खराब कपड्यांमध्ये बंदीस्त असलेल्या पुतळ्याचे रविवारी (16 नोव्हेंबर) मनसेचे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी अचानक अनावरण केले. यावेळी पोलीस आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये झटापट सुध्दा झाली होती. या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात अमित ठाकरे आणि 70 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले होते. दरम्यान अमित ठाकरेंनी अनावरण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला परत एकदा कपड्याने बंदीस्त करण्यात आले आहे. महानगरपालिकेने छत्रपतींना बंदीस्त करून हे  मोगलाई सरकार असल्याचे सिद्ध केले, असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी केलाय. येत्या काळात परत एकदा गनिमी काव्याचे अनावरण करू, असा इशारा मनसेने दिला आहे. तसेच अमित ठाकरेंनी देखील सरकारवर हल्लाबोल केला आहे. 

Continues below advertisement

अमित ठाकरे काय म्हणाले? (Amit Thackeray On Chhatrapati Shivaji Maharaj Statue)

माझ्या सहकाऱ्यांसह विधिवत आरती करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले गेले. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह सभोवतालच्या मंडपाला आज पुन्हा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवण्यात आलं आहे. एकच सांगतो, तो कपडा आम्ही पुन्हा काढून फेकू. कारण महाराजांच्या दर्शनाचा हक्क प्रत्येकाला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही एका क्षणासाठीही सहन करणार नाही, असं अमित ठाकरे म्हणाले.  छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत. त्यांच्या सन्मानासाठी जे काही सहन करावं लागेल, ते सगळं आम्ही आनंदाने सहन करू, असं अमित ठाकरेंनी सांगितले. माझ्या राजकीय आयुष्यातील पहिली केस ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहे. याचा मला अभिमान आहे, असंही अमित ठाकरे म्हणाले. 

आदित्य ठाकरे काय म्हणाले? (Aditya Thackeray On Amit Thackeray)

माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील सदर प्रकरणावर भाष्य केलं आहे. आमच्याच राज्यात, आमच्याच दैवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही. 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कापडाने झाकून ठेवलात आणि काल अमितने हा महाराजांचा अपमान सहन न झाल्याने त्या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं, महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? निवडणूक आयोग सरकारची ही दादागिरी मोडून काढू, असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

नेमकं प्रकरण काय? (Navi Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Statue)

नवी मुंबईच्या नेरुळमध्ये राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा चार महिन्यांपासून अनावरणाच्या प्रतिक्षेत तसाच झाकून ठेवलेल्या अवस्थेत होता. अमित ठाकरेंना ही बाब समजताच त्यांनी परवानगी न घेता त्या पुतळ्याचं अनावरण केलं. याच प्रकरणात त्यांच्यावर आणि 70 मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नवी मुंबईतील कौपरखैरणे येथे मनसे शाखेच्या उद्घाटनासाठी अमित ठाकरे आले होते. त्यावेळी त्यांना महाराजांची मूर्ती कापडाने झाकून ठेवल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी तात्काळ मनसैनिकांच्या मदतीने पोलिसांच्या डोळ्यादेखत पुतळ्याचं अनावरण केलं. यावेळी मनसैनिक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याने काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसून आलं.

संबंधित बातमी:

Amit Thackeray : अमित ठाकरे यांच्यावर आयुष्यातील पहिला गुन्हा दाखल, निमित्त ठरले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा