पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) भाजपने (BJP) कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये सोमवारी भाजपचं महासंमेलन आयोजित करण्यात आलं आहे. पुण्यामध्ये भाजप महासंमेलन पार पडणार असून त्याआधी रविवारी भाजप प्रदेश कार्यकारणीचं अधिवेशन पार पडणार आहे. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुण्यात दाखल झाले आहेत. भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. मात्र, भाजपला लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही. महाराष्ट्रात महायुतीचा प्लॅन पुरता फेल गेला अन् महाविकास आघाडीच्या पाठबळात काँग्रेसने बाजी मारली. या पार्श्वभूमीवर भाजपनं आगामी विधानसभा निवडणुकीचा प्लॅन आखण्यास सुरुवात केली आहे.


अमित शाह भाजप पदाधिकाऱ्यांची कानउघडणी करणार?


भाजप कार्यकारणीचं अधिवेशन आणि महासंमेलनासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं शनिवारी रात्रीच पुण्यात आगमन झालं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून विमानतळावर अमित शाहांचं स्वागत करण्यात आलं. भाजप विधानसभेत 150 ते 160 जागा लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. विधानसभा निवडणुकांसाठी भाजप सोमवारी रणशिंग फुंकणार आहे. त्याआधी पार पडणाऱ्या भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या अधिवेशनाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.






भाजप विधानसभेचा रोड मॅप ठरवणार


लोकसभेतील खराब कामगिरीमुळे अमित शाह भाजपची कशाप्रकारे कानउघडणी करणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आज अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे प्रदेश कार्यकारिणीच अधिवेशनात होणार आहे. सकाळी 11 पासून अधिवेशनाला सुरुवात होईल. लोकसभेत राज्यात भाजपाला मिळालेल्या कमी जागा यावर अमित शाह यांच्याकडून पदाधिकाऱ्यांना काय बोलणार, याबाबत उत्सुकता असणार आहे. तसेच विरोधकांच्या खोट्या नरेटीववरही राजकीय प्रस्ताव मांडला जाणार असून आजच्या अधिवेशनात विधानसभेचा रोड मॅप ठरवला जाणार आहे.


भाजपकडून आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी


सकाळी दहा वाजता भाजप प्रदेश कार्यकारणीच्या अधिवेशनाचं उद्घाटन झाल्यानंतर प्रत्येक सत्राला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून आगामी विधानसभा निवडणुकीत कशाप्रकारे तयारी करायची, याचे विविध पातळ्यांवरील तयारीबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे. जागावाटपासोबतच ठिकठिकाणी महायुतीची ताकद वाढवण्यासाठी, राज्यात काढल्या जाणाऱ्या संवाद यात्रेची तयारी आणि विधानसभेसाठी व्यूहरचना, भाजप नेत्यांवर दिली जाणारी विभागवार जबाबदारी, यावर आज अमित शाहांच्या उपस्थितीत चर्चा केली जाईल. 


सुमारे 4 हजार पदाधिकारी उपस्थित राहणार


यावेळी नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक भाजपाचे जेष्ठ नेते उपस्थित राहतील. अधिवेशनाला सुमारे चार हजार पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मंडल प्रमुखापासून ते राज्याच्या प्रदेश पातळीवरील पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी होणार असून त्यांचं मार्गदर्शन केलं जाणार आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे अधिवेशन असणार आहे.