पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षातील खासदारांना संपर्क केल्याची आणि सत्तेत सोबत येण्याची ऑफर दिली असल्याची माहिती समोर आली होती. शरद पवारांच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना वगळून पक्षातील इतर सात खासदारांच्या (NCP MP) भेटी घेऊन त्यांना यासंबंधीची ऑफर दिल्याची माहिती होती. केंद्र सरकारला अधिक स्थिरता मिळावी यासाठी या सात खासदारांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू आहेत, अशी चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू होती. त्याबाबत शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी बोलताना पार्लमेंट सुरू असताना अशा प्रकारचा संपर्क तटकरेंनी केला अशी चर्चा आहे. शरद पवारांसोबत असलेल्यांपैकी कोणीही वेगळा निर्णय घेणार नाही. अजित पवारांच्या (Ajit Pawar) पक्षात असणारे सर्व प्रमुख नेते शरद पवारांचा आदर करतात मात्र तटकरे करत नसावेत असं वाटतंय. अजित पवार (Ajit Pawar) प्रमूख नेते असले तरी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचं पक्षात जास्त चालते. आमच्या पक्षात सत्तेत गेलं पाहिजे, अशी चर्चा नाही. खासदारांमध्ये देखील याबाबत चर्चा नाही. सुनिल तटकरे (Sunil Tatkare) स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर डील करत आहेत का? हे पाहायला हवं. पक्षात तटकरे यांचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात आहे, असंही रोहित पवारांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. 


सुनील तटकरे आणि प्रफुल पटेलांचं बरंच काही पक्षात चालतं


अजितदादांच्या पक्षाबाबत बोलायचं झाल्यास मला असं वाटतं, अजितदादा हे प्रमुख नेते आहेत, पण आपण जेव्हा खोलात जातो तेव्हा दादा प्रमुख नेते असले तरी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचं बरंच काही पक्षात चालतं, असं मला वाटतं. पण, प्रफुल पटेल हे अनेक वर्षांपासून शरद पवार यांच्यासोबत काम केलेले नेते आहेत. तटकरे यांच्या बाबतीत काय खूप काही खोलात जाऊन सांगता येणार नाही, असंही पुढे रोहित पवार म्हणालेत. 


अजितदादा जोपर्यंत वक्तव्य करत नाहीत, तोपर्यंत...


सुनिल तटकरे स्वतःच्या वैयक्तिक पातळीवर डील करत आहेत का? हा त्यांचा विषय आहे. पण आम्ही त्या पक्षाकडे बघत असताना आम्ही दादांकडे नेहमी बघत असतो. दादांची कार्यपद्धती, स्टाईल आणि दादा त्या पक्षाचे प्रमुख आहेत. हे बाहेरून नक्की खरं असलं तर आता पण खोलात गेलो, तर सुनील तटकरे यांचा हस्तक्षेप त्या पक्षामध्ये जास्त प्रमाणात आहे अशी चर्चा आहे. अजित दादा जोपर्यंत वक्तव्य करत नाहीत. तोपर्यंत कोणत्याही वक्तव्याला खरं समजलं पाहिजे असं मला वाटत नाही. दादा पक्षाचे प्रमुख असल्यामुळे दादा जे बोलतील ते त्या पक्षाची भूमिका असेल, असं आपल्याला म्हणावा लागेल असे पुढे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 


 रोहित पवारांनी केली अजित पवारांची पाठराखण 


बीड घटनेवरून आणि अजित पवार यांच्या त्या संदर्भातील भूमिकेवरती विचारलेल्या प्रश्नावर रोहित पवार यांनी काकाची पाठराखण करत कोणी सुट्टीवर जात असेल तर त्यात काही हरकत नाही असं म्हंटलं आहे. कोणी आमदार खासदार किंवा राज्यकर्ता सुट्टीवर जात असेल तर त्यात काही हरकत नाही. बारा महिने हे सर्व लोक काम करत असतात. ते सुट्टीवर गेले होते. आता ते परत आले आहेत. ते फोन वरती काम करतच असावेत. कारण ती त्यांची पद्धत राहिलेली आहे. आता जर आपण बघितलं तर आज अर्थमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी खूप मोठी आहे. कॅग किंवा इतर रिपोर्ट पाहिले तर ते राज्याच्या तिजोरीबाबत फार सकारात्मक आहेत असं मला वाटत नाही. अडचणी आहेत. अर्थमंत्री म्हणून त्यांच्या जबाबदारी मोठी असल्यामुळे त्या कामात देखील ते असावेत इतर विषयाच्या बाबतीत त्यांनी वक्तव्य केलं नसावं, असंही पुढे रोहित पवारांनी म्हटलं होतं.


देवेंद्र फडणवीस हे नक्कीच सहाव्या गेरमध्ये


गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितला तर देवेंद्र फडणवीस हे नक्कीच सहाव्या गेरमध्ये आहेत, तसं म्हणावं लागेल. त्यांनी सर्व विभागाच्या बैठका घेतलेल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी जे काम करायला पाहिजे ते देखील मुख्यमंत्री करत आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार किंवा इतरही आमदार मंत्री असू देत त्यांच्या विभागाच्या बैठका त्यांनी घेतलेले आहेत. एकीकडे काही मंत्री वेळ बघून कार्यभार स्वीकारत असताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व सेक्रेटरीच्या सोबत बैठका झाल्या. नियोजन झालेला आहे. अनेक आदेश दिलेले आहेत. बाकीचे जागे होण्याआधी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विभागाच्या बैठका घेऊन सर्व विभाग कामाला लावलेले आहेत. बाकी मंत्री कुठे काम करताना दिसत नाहीत, काही अनुभवी मंत्री काम करत आहेत. मात्र, सर्वच मंत्र्यांना सर्वच अधिकार दिलेत असं वाटत नाही. दुर्दैव असं सर्व राज्यमंत्रीपद हे युवांना दिलेला आहे. पण त्यांना अजूनपर्यंत त्यांचे सेक्रेटरी प्रायव्हेट सेक्रेटरी आणि पीए नियुक्त करण्याचे अधिकार दिले गेले नाही. म्हणजे युवकांना संधी दिली पण बिचाऱ्यांना त्यांचे पीए नियुक्त करण्यामध्येच बिझी आहेत, अजून त्यांनी त्यांचे काम सुरू केलेले नाही. मंत्री फक्त नावापुरते आहेत. कारण खरंच ते काम करणार की नाही ते येत्या काळामध्ये दिसणार आहे, असे पुढे रोहित पवार यांनी म्हटले आहे.