सोलापूर : लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित निकाला पाहायला मिळाला, तर महाविकास आघाडीचे शिल्पकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांचा करिश्मा दिसून आलं. त्यामुळे, लोकसभेला महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळाला असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे एकमेव खासदार निवडून आले आहेत. या निवडणुकांचा निकाल पाहून शरद पवारांकडे विधानसभा निवडणुकांसाठी अनेक नेतेमंडळी जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर, काही नेते शरद पवार किंवा त्यांच्या पक्षातील नेत्यांची भेट घेत आहेत. इंदापूरमधील भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही शरद पवारांची भेट घेतली होती. तर, काही दिवसांपूर्वी परभणीत बाबाजानी दुर्रानी यांनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आता, अजित पवार यांच्या गटातील आमदाराने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत कारमधून एकत्र प्रवास केला.  


सोलापूर (Solapur) हा राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) बालेकिल्ला राहिला आहे, शरद पवारांची या जिल्ह्यावरील पकड आजही कायम आहे. त्यामुळेच, लोकसभा निवडणुकीत ऐनेवळी मोहित पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करुन निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. माढ्याचे बबन शिंदे आणि मोहोळचे यशवंत (Yashwant mane) माने दोघेही अजित पवारांसमवेत आहेत. मात्र, आज यशवंत माने यांनी सुप्रिया सुळेंसोबत (Supriya sule) एकत्र प्रवास केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.  


मोहोळचे आमदार यशवंत माने आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या भेटीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया सुळेंच्या कारमधूनच आमदार यशवंत माने. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य हनुमंत बंडगर यांच्या वडिलांचे काल निधन झाले. त्यांच्या घरी सुप्रिया सुळे सांत्वन भेटीसाठी गेले होत्या. त्यावेळी मोहोळचे आमदार यशवंत माने देखील तिथेच होते. या सांत्वन भेटीनंतर सुळे आणि आमदार यशवंत माने यांनी भिगवण ते बारामती असा एकाच कारमधून प्रवास केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या गटातील काही आमदार शरद पवारांकडे येण्यास इच्छुक असल्याची चर्चा सातत्याने होत असते. तर, जयंत पाटील व रोहित पवार यांच्याकडून या वृत्तांना दुजोराही दिला जातो. त्यातच, आजही ही भेट ठरवून होती की अचानक झाली, याचीही चर्चा आता होत आहे. कारण, अजितदादांचा आमदार थेट सुप्रियाताईंच्या कारमध्ये बसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं आहे. 




दरम्यान, भाजपचे इंदापूरमधील नेते हर्षवर्धन पाटील हेदेखील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. मंगळवारी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये हे दोन्ही नेते संस्थेच्या बैठकीच्यानिमित्ताने आमनेसामने आले. या बैठकीनंतर शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात चर्चाही झाली. त्यांच्या हसत-खेळत चर्चा करतानाचे व्हिडिओही समोर आले होते. त्यामुळे हर्षवर्धन पाटील लवकरच तुतारी हाती धरणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. कारण, इंदापूरमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे, महायुतीत ही जागा राष्ट्रवादीला म्हणजेच दत्तात्रय भरणे यांच्यासाठी सुटू शकते, असा दावा केला जात आहे.  


मी इंदापूरमधून लढणार - हर्षवर्धन पाटील


इंदापूरमधून निवडणूक लढविण्यावर मी ठाम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  त्याबाबतचा निर्णय घेतील. अन्य कोणत्याही पक्षाच्या नेत्याशी माझा संपर्क झालेला नाही. मीदेखील कोणाच्या संपर्कात नाही. मात्र, मी निवडणूक लढवावी, यावर कार्यकर्ते ठाम आहेत.