Aaditya Thackeray In Akola: शिवसैनिक म्हणून आमच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढणारा, ज्यांनी स्वतःला विकलं नाही, स्वतःचा मान सन्मान विकला नाही, इमान विकलं नाही अशा व्यक्तीला मिठी मारायला अकोल्यात आलो असल्याचे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आमच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना महाराष्ट्रात उभे राहण्याची हिंमत नव्हती म्हणून त्यांनी गुवाहाटीमध्ये जाऊन गद्दारी केली आहे. त्या गद्दारांना राज्यातील जनता धडा शिकवणार असल्याचा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. अकोल्यातील बाळापूर येथे आयोजित शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते. 


आदित्य ठाकरे म्हणाले पुढे म्हणाले की, राज्यातील सरकार हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे लवकरच कोसळणार असून  तुम्ही सज्ज रहा. लोकांपर्यंत पोहोचा, लोकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करा. शिवसेनेची खरी ताकद हे सच्चे शिवसैनिक आहेत. हे सच्चे लढवय्ये माझ्या पिढीसाठी आदर्श आहे. जनतेमुळे मोठे झालेले 40 गद्दार महाराष्ट्रातून पळून गेले आणि त्यांनी जनतेचा विश्वासघात करुन हे सरकार स्थापन केले आहे. ते कोसळणारच असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.


अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल आहे. त्यांना मदत करण्याची गरज असताना हे गद्दार आमदार एकमेकांसोबत भांडण्यात व्यस्त असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. एकमेकांवर टीका करतात. मात्र शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना जाब विचारण्याची हिंमत यांच्यात नसल्याचेही सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिंदे गट आणि राणा-कडू यांच्यातील वादावर टीका केली. तसेच शेतकऱ्यांना मदत मिळाली नसून फक्त हवेत घोषणा सुरु असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.


राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे? हे देखील जनतेला कळायला मार्ग नसून या गद्दारांनी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी गद्दारी केली आहे. विदर्भातील तरुणांसोबतही हे सरकार गद्दारी करत असून एक एक करुन सगळे प्रकल्प पळवून नेत आहे. त्यामुळे यांना धडा शिकविण्याची गरज असल्याचेही यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले.


हे चाळीस गद्दार लग्नातही गेले तरी लोकं त्यांना पन्नास खोके, एकदम ओक्के म्हणून चिडवतात. त्यामुळे हे गद्दार आता कुठे तोंड दाखवायच्या लायकीचे नसल्याचीही सडकून टीकाही यावेळी त्यांनी केली. मी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, महिलांच्या सन्मानासाठी, तरुणांच्या प्रश्नांसाठी तुमच्या सोबत उभा असल्याचेही यावेळी ते म्हणाले. तसेच त्यांनी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतो. चाळीस गद्दारांनीही राजीनामा द्यावा आणि राज्यातील जनतेला ठरवू द्या ते कोणाच्या पाठीशी उभे आहे असे आव्हानही दिले.


हेही वाचा


Maharashtra Politics: श्रीकांत शिंदेंच्या सभेत आदित्य ठाकरेंचे कार्टून; अब्दुल सत्तारांनी सांगितले कारण