नवी दिल्ली: आयपीएलच्या या मोसमालाही आता मॅच फिक्सिंगचं ग्रहण लागताना दिसतं आहे. कारण पोलिसांकडून फिक्सिंगप्रकरणी गुजरात लायन्सच्या काही खेळाडूंची चौकशी होऊ शकते. काही दिवसांपूर्वी कानपूरमधल्या आयपीएल मॅचदरम्यान गुजरातची टीम ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथूनच 2 सट्टेबाजांना पोलिसांनी अटक केली आहे.
सट्टेबाज नयन शाहकडून काही रेकॉर्डिंग पोलिसांना मिळाल्या आहेत. यामध्ये गुजरात लायन्सचे 2 खेळाडू सट्टेबाजांच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. आतापर्यंत त्या खेळाडूंची नावं कळू शकलेली नाही. याशिवाय सट्टेबाज हा स्टेडिअमवर काम करणाऱ्या रमेश या व्यक्तीच्याही संपर्कात होता.
सट्टेबाजानं सांगितल्याप्रमाणं मैदानावर पाणी टाकण्याचं काम याच्याकडे होतं. मात्र, त्यामध्ये तो यशस्वी होऊ शकला नाही असं पोलिसांकडून सांगण्यात आलं.
दरम्यान, तीन दिवसांपूर्वी बुधवारी कानपूरमध्ये गुजरात लायन्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना झाला होता. यामध्ये गुजरातनं पहिले फलंदाजी करताना 195 धावा केल्या होत्या. पण तरीही गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला होता.
आतापर्यंत 13 सामन्यांमध्ये फक्त 4 सामन्यांमध्येच गुजरातनं विजय मिळवला आहे. आठ गुणांसह गुजरात सातव्या स्थानी आहे. दरम्यान, आज गुजरातचा सामना सनरायजर्स हैदराबादसोबत आहे.