Philippines Earthquake: फिलीपाईन्समध्ये झालेल्या 6.9 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात (Earthquake News) आतापर्यंत किमान 26 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच 147 हुन अधिक लोक यात जखमी झाले असल्याची माहिती राष्ट्रीय आपत्ती संस्थेने (National Disaster Risk Reduction and Management Council) बुधवारी (1 ऑक्टोबर) दिलीय. (Philippines Earthquake News)
मिळालेल्या माहितीनुसार, सेबूच्या उत्तर किनाऱ्यावर स्थानिक वेळेनुसार रात्री 9.50 वाजता (१३५९ GMT) मोठा भूकंप झाला, ज्यामुळे इमारती कोसळल्या, भूस्खलन झाले आणि अनेक शहरे अंधारात बुडाली. यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सुरुवातीला 7.0 तीव्रतेचे भूकंप असल्याचे गणलं गेलं आणि नंतर ते कमी होत गेलाय. मंगळवारी रात्री फिलीपिन्समध्ये झालेल्या या भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या, त्यात किमान 26 जणांचा मृत्यू झाला आणि 147 जण जखमी झाले. अधिकाऱ्यांनी सांगितले की ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सध्या बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. परिणामी मृतांचा आकडा देखील वाढण्याची भीती आहे.
26 नागरिकांचा मृत्यू, तर 147हून अधिक जखमी, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू (Philippines Earthquake)
अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षणानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू सेबू प्रांतातील बोगो सिटीच्या ईशान्येस सुमारे 19 किलोमीटर अंतरावर आणि सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता. सुनामीचा इशारा सुरुवातीला देण्यात आला होता, परंतु नंतर तो मागे घेण्यात आला. दरम्यान, बाधित भागात मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आले आहेत आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
राष्ट्रीय आपत्ती जोखीम कमी आणि व्यवस्थापन परिषदेने (NDRRMC) त्यांच्या ताज्या बुलेटिनमध्ये असे म्हटले आहे की, संपूर्ण प्रदेशात किमान 22 इमारतींचे नुकसान झाले आहे. सॅन रेमिजिओ येथे बास्केटबॉल खेळादरम्यान क्रीडा केंद्राचे छत कोसळल्याने मृतांमध्ये तीन तटरक्षक दलाचे सदस्य आहेत. बोगोमध्ये, भूस्खलनात किंवा ढिगाऱ्यात चिरडून नऊ प्रौढ आणि चार मुले मृत्युमुखी पडली आहेत.
फिलीपाईन्समध्ये 379 भूकंपाचे धक्के, सतर्क राहण्याचे आवाहन (Philippines Earthquake Rescue Operations Underway)
बचावकर्त्यांनी इशारा दिला आहे की आणखी काही लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असू शकतात. यात कोलमडलेल्या इमारतींखाली देखील लोक असू शकतात, अशी भीती बचाव अधिकारी विल्सन रामोस यांनी एएफपीला सांगितले. भूकंपानंतरच्या धक्क्यांमुळे आणि अंधारामुळे रात्रीच्या कामात अडथळा निर्माण झाला आहे. ज्वालामुखी आणि भूकंपशास्त्र संस्थेच्या मते, हा प्रदेश 379 भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला आहे. तर सेबूच्या गव्हर्नर पामेला बॅरिक्युआट्रो यांनी रहिवाशांना शांत राहण्याचे, नुकसान झालेल्या इमारतींपासून दूर राहण्याचे आणि पुढील भूकंपांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. फिलीपिन्स पॅसिफिक "रिंग ऑफ फायर" वर वसलेले आहे, जिथे भूकंप वारंवार होतात आणि अनेकदा प्राणघातक असतात.