परभणी : पोलिसांच्या मारहाणीत कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली आहे.  जोपर्यंत सोमनाथला न्याय मिळत नाही, त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही अशी भूमिका सूर्यवंशी कुटुंबीयांनी घेतली आहे. न्यायालयीन कोठडीत असताना 35 वर्षीय सोमनाथचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीच्या धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टेममधून समोर आलं होतं. 


तलाठी आणि मंडळ अधिकारी हे 10 लाखांच्या मदतीचा चेक घेऊन सूर्यवंशी कुटुंबीयांच्या भेटीला आले होते. त्यावेळी सोमनाथच्या कुटुंबीयांनी ही मदत नाकारली. माझ्या मुलाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मदत घेणार नाही अशी भूमिका सोमनाथच्या आईने घेतली. सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मदत स्वीकारणार नाही असं सोमनाथच्या भावाने स्पष्ट केलं. 


पोलिसांच्या मारहाणीत सोमनाथचा मृत्यू


परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली.


अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला. 


सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.


ही बातमी वाचा: