परभणी : राज्यात तुकडे बंदी कायद्याची अंमलबजावणी कडकपणे सुरू असताना, अनेक ठिकाणी प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या भूखंडाची खरेदी विक्री भूमाफिया अधिकाऱ्यांना हाताशी धरून करत आहेत. परभणीच्या (Parbhani) सोनपेठ, पाथरी मधील अनेक प्रकरणांनंतर आता मानवतमध्ये तर चक्क उपजिल्हाधिकारी यांच्या बनावट सह्या करून प्लॉटची खरेदी-विक्री करण्यात आली आहे. असे तब्बल 37 प्लॉटची विक्री अनधिकृत रित्या करण्यात आली आहे. स्वतः उपजिल्हाधिकारी प्रतीक्षा भुते यांनी याबाबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना पत्र लिहून या सर्व भूखंडाचे फेरफार रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, जिल्हाधिकारी यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.


काय आहे प्रकरण? 


पाथरी येथील सर्व्हे नंबर 155/1 आणि 155/2 येथील जागा शेतीसाठी समाविष्ट असल्याने त्याचा रहिवाशी वापर करता येत नाही. असे असताना इथे प्लॉटिंग करून अनेक प्लॉट विक्री करण्यात आलेल्या लक्ष्मी नगरीची प्लॉटिंग ही बेकायदेशीर असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या चौकशी समितीने दिला आहे. दोन्ही प्रकरणे अत्यंत गंभीर असताना पाथरी उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी हे 20, 22 आणि 23 फेब्रुवारी 3 दिवस सुट्टीवर असताना त्यांच्या जागी प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून प्रतीक्षा भुते यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. केवळ 3 दिवस प्रभारी अधिकारी असलेल्या उपजिल्हाधिकारी प्रतीक्षा भुते यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून मानवत येथील गट क्रमांक 482/2 येथील भूखंडातील प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी विक्रीच्या तब्बल 37 प्लॉट बाबत बनावट परवानग्या जोडल्या आहेत. तसेच बनावट सह्या करून खोटे कागतपत्र सादर केले. महत्त्वाचे म्हणजे थेट मानवतच्या दुय्यम निबंधकांनी उपजिल्हाधिकारी यांच्या कार्यलयाचे जावक क्रमांक, शिक्के मारलेले नसताना त्याची साधी खातरजमा न करता रजिस्ट्री करून दिल्या आहेत.


मी फक्त 3 कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या 


माझ्याकडे केवळ तीनच दिवस पाथरी उपविभागीय अधिकारी पदाचा चार्ज होता. त्यातही पहिल्या दिवशी बारावीच्या परीक्षा असल्याने मी त्यात व्यस्त होते. दुसऱ्या दिवशी एका प्रकरणात सेलूच्या आडगाव दराडे होते. त्यामुळे या तीन दिवसांत फक्त 3 कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्यामुळे इतर  कागदपत्रांवर माझ्या एवढ्या स्वाक्षऱ्या आल्या कोठून? असा मलाही प्रश्न पडला आहे. तर याची चौकशी करण्याची मागणी मी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असल्याचं उपजिल्हाधिकारी प्रतीक्षा भूते यांनी म्हटले आहे.


राजकीय भूमाफियांकडून तुकडे बंदी कायद्याची थेट पायमल्ली


परभणी जिल्ह्यातील पाथरी उपविभागा अंतर्गत येत असलेल्या पाथरी, मानवत, सोनपेठ या 3 शहर आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणावर तुकडे बंदी कायद्याची थेट पायमल्ली होत आहे. अधिकाऱ्यांच्या मदतीने राजकीय भूमाफिया आपली पोळी भाजत असल्याचे समोर आले आहे. सोनपेठ शहरातील अनेक भूखंड अनाधिकृत रित्या प्लॉटिंग करून विक्री करण्याचा घाट घालण्यात आला होता. मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या भूखंड विक्रीवर निर्बंध घातले होते. तसेच, तत्कालीन नगर परिषद सीईओ, भूमिअभिलेख, दुय्यम निबंधक कार्यालयासह नगर परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीसी बजावल्या होत्या.


अधिकारी काय म्हणतात? 



  • पुढील दोन-तीन दिवसांत याबाबत अहवाल येईल. त्यानंतर कारवाईबाबत काय तो निर्णय घ्यायचा हे निश्चित होईल, असे निवासी उपजिल्हाधिकारी दत्तू शेवाळे यांनी सांगितले आहे.

  • याबाबत आम्ही जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांना प्रतिक्रियेसाठी संपर्क केला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

  • दरम्यान, पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांच्या कार्यक्षेत्रात एकूण 3 तालुके येतात. तसेच नगर परिषदेचेही देखील ते प्रशासक आहेत. त्यांचा अशा प्रकरणांवर वचक असायला हवा तसेच कारवाई होणे देखील अपेक्षित आहे. मात्र, मानवतच्या प्रकरणात तर त्यांनी आपण सुट्टीवर असल्याचे सांगत हात झटकले आहे. तर, याबाबत तहसीलदार यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. चौकशी झाल्यावर पुढील काय तो निर्णय घेतला जाईल अशी प्रतिक्रिया उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांनी दिली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: