परभणी : जिल्ह्यातील दगडफेक प्रखरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या तरुणाचे नाव सोमनाथ सूर्यवंशी असून त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलंय. दरम्यान या प्रकरणामुळे आता परभणीत पुन्हा एकदा वातावरण तापण्याची शक्यता आहे. कारण रिपब्लिकन सेना पक्षाचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी या तरुणांच्या मृत्यूनंतर महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
परभणी येथील घटनेचा आनंदराज आंबेडकर यांनी निषेध केला आहे. तसेच सोमनाथ यांचा मृत्यू संशयास्पद असून त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली. सोबतच त्यांनी या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
आनंदराज आंबेडकर नेमकं काय म्हणाले?
परभणी येथील घटनेत पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीने शहीद सोमनाथ सूर्यवंशी हा आंबेडकरी तरुण संविधानाच्या रक्षणार्थ पोलिसांच्या कस्टडीत शहीद झाला आहे. सोमनाथचा मृत्यू संशयास्पद असून याच्या निषेधार्थ सर्व आंबेडकरी व संविधानवादी जनतेने उद्याच्या महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.
तसेच या बंदच्या माध्यमातून त्यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत.
1) आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
2) अटकेतील सर्व आंदोलकांची सुटका करावी व अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी
3) शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.
अशा मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या आहेत.
प्रकाश आंबेडकरांनीही केली चौकशीची मागणी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनीदेखील या घटनेचा निषेध व्यक्त करत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केल आहे. "परभणीत वडार समाजातील भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. हे अत्यंत वेदनादायक आणि दुःखद आहे. त्यांचा जामीन अर्ज मंजूर होऊनही न्यायालयीन कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला, हे वेदनादायक आहे," अशा भावना प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केल्या.
कॅमेऱ्यापुढे शवविच्छेदन करण्याची मागणी
तसेच, सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला असल्याने आमचे वकील न्यायालयाला विनंती करतील की पोस्टमॉर्टम (सीटी स्कॅन, एमआरआय, फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजिकल) तपासणी फॉरेन्सिक विभाग असलेल्या सरकारी रुग्णालयातच केली जावी. याचे चित्रीकरण करण्यात यावे. फॉरेन्सिक आणि पॅथॉलॉजी या दोन्ही विभागांच्या देखरेखीखाली पोस्टमॉर्टम केले जावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तसेच आम्ही न्यायासाठी लढत राहू, असेही त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा :
मोठी बातमी! दगडफेक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या तरुणाचा कारागृहातच मृत्यू, परभणीत अस्वस्थता