Parbhani Rain : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या अर्धा तासापासून सुरु असलेल्या पावसामुळं रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. दरम्यान, या पावसामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांचे हेलिकॉप्टर थांबले आहे. पावसामुळं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही पोलीस मुख्यालयात थांबले आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे कारने बीडच्या दिशेनं रवाना झाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह अनेक नेते आज (26 ऑगस्ट) रोजी परभणी दौऱ्यावर आले होते. परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' या जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी हे नेते परभणीत दाखल झाले होते. मात्र, कार्यक्रम सुरु झाल्यावर पावसाला सुरुवात झाली. कार्यक्रम स्थळातून बाहेर पडताच पावसाचा जोर अधिक वाढला. या कार्यक्रमासाठी आलेल्या लाभार्थ्यांसह पोलिस आणि शासकीय यंत्रणेची मोठी धावपळ झाली. अनेक महिला, लहान मुलं, अधिकारी कर्मचारी या पावसामुळं मिळेल ते डोक्यावर घेऊन तसेच जागा मिळेल तिथे पावसापासून बचाव करण्यासाठी थांबले.
बीडमध्येही जोरदार पावसाला सुरुवात
बीडमध्येही जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसापासून पावसानं विश्रांती घेतली होती. मात्र, आज जोरदार पाऊस सुरु झाला आहे. या पावसामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हेलिकॉप्टरने बीडला येणं टाळलं आहे. अजित पवार हे कारने बीडच्या दिशेनं रवाना झाले आहेत. दरम्यान, काही वेळातच अजित पवार यांची बीडमध्ये जाहीर सभा होमार आहे. पावसामुळं अजित पवारांची बीडमध्ये होणीरी रॅली रद्द करण्यात आली आहे. थोड्याच वेळी जाहीर सभेला सुरुवात होणार आहे.
मुंबईमध्येही जोरदार पावसाला सुरुवात
दुपारनंतर मुंबईसह परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. दादर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची एकच तारांबळ उडाली. छत्रपती शिवाजी पार्क येथे खेळाडूंनी भर पावसात भिजून खेळाचा आनंद लुटला. तर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळं दिलासा मिळाला. या पावसामुळं परीसरात थोडा गारवा निर्माण झाला आहे. ठाणे परिसरातही जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. पावसामुळं संथ गतीनं वाहतूक सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या: