परभणी : जिंतूरमध्ये पुन्हा एकदा मेघना बोर्डीकर- विजय भांबळे यांच्यात संघर्ष उफाळून आल्याचं दिसतंय. यावेळी त्याला निमित्त ठरलंय ते म्हणजे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यावर करण्यात आलेली फेसबुक पोस्ट. राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या पुतण्याला या प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर नोटीस देऊन सोडून दिलं. तर विजय भांबळे यांचा पुतण्या पृथ्वीराज भांबळे याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजपने केली आहे.

दुसऱ्याच्या नावाने फेसबुक अकाउंट उघडत परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाने आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आल्याचं समोर आलं. या प्रकरणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार विजय भांबळे यांचा पुतण्या पृथ्वीराज भांबळे याचा हात असल्याचं स्पष्ट झालं.

Meghna Bordikar Facebook Post : जिंतूरमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त

त्यानंतर पोलिसांनी पृथ्वीराज भांबळे याला ताब्यात घेऊन नोटीस देत सोडले आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा जिंतूरमध्ये भांबळे विरुद्ध बोर्डीकर असा वाद उफाळल्याचं दिसून आलं. हे प्रकरण घडल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिंतूरमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणात पृथ्वीराज भांबळे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने अप्पर पोलीस अधीक्षकांना भेटून केली.

काही दिवसांपूर्वी विष्णू नागरे नावाच्या फेसबुक अकाउंटवरून पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या नावाने एक आक्षपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती. या प्रकरणात मेघना बोर्डीकरांचे बंधशिवाजी कदम यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पृथ्वीराज भांबळेच्या मोबाईलमध्ये फेक अकाउंट

या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर हे अकाउंट पृथ्वीराज भांबळे यांने त्याच्या मोबाईलमध्ये उघडले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात पृथ्वीराज भांबळे याला मंगळवारी रात्री ताब्यात घेतल आणि नोटीस देऊन सोडून दिले.

प्रकरणी माजी आमदार विजय भांबळे यांच्यांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आली नाही. मात्र माजी आमदारांच्या निकटवर्तीयांना याबाबत विचारले असता कुणीतरी पृथ्वीराज भांबळे यांचा मोबाईल घेवून हा प्रकार केला असल्याचे सांगण्यात आलं.

ही बातमी वाचा: