परभणी: शहरातील मॉडेल उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका आणि लिपिकाला आपल्याच शाळेतील पर्यवेक्षकाकडून लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या दोघांवरही शहरातील कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुख्याध्यापिकेच्या घरी झडती घेतली असता 9 लाख 75 हजार रुपये सापडले आहेत. त्यामुळे परभणीच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणात तक्रारकर्ता हा मॉडेल उर्दू हायस्कूलमधील पर्यवेक्षकच आहे. तो त्याचे काम करीत असताना तिथे शाळेतील लिपीक बुढण खान पठाण आला. तुम्हाला माहे एप्रिल ते सप्टेंबर 2024 या 6 महिन्यांचे प्रलंबित वेतन मिळाले आहे. त्या वेतनातून प्रती महिना 3 हजार असे 6 महिन्याचे एकूण 18 हजार रुपये मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी मॅडम यांनी मागितले असल्याचे त्याने सांगितले.
पर्यवेक्षकाने मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांची भेट घेतली असता त्यांनीही 6 महिन्याच्या वेतनातून 18 हजार रुपये आणून देण्याची मागणी केली. त्यानंतर पर्यवेक्षकानी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे या संबंधीची तक्रार दिल्यानंतर याची पडताळणी 18 मार्च रोजी करण्यात आली. बुधवारी सायंकाळी सापळा रचण्यात आला.
मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांनी शाळेतच संबंधित तक्रारकर्त्यास ती रक्कम लिपीक बुढण खान पठाण यांच्याकडे द्यावी, असे सांगितले. लिपीकाने संबंधित तक्रारकर्त्याकडून मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांच्या सांगण्यावरुन ती रक्कम स्विकारली. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने मुख्याध्यापिका आणि लिपीक या दोघांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेतले.
दरम्यान, मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांच्याकडून यावेळी पथकाने रोख रक्कम 9 हजार 840 रुपये व लिपीक बुढाण खान यांच्याकडून 5 हजार 190 रुपये व मोबाईल ताब्यात घेतले. पथकाने मुख्याध्यापिका सिद्धीकी अहेमदी यांच्या घरून झडतीतून 9 लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कम ताब्यात घेतली. या प्रकरणी दोघांवरही कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच घेणाऱ्या न्यायाधीशाचा अटकपूर्व जामीन फेटाळला
साताऱ्यातील लाच घेणाऱ्या न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला आहे. एका प्रकरणात आरोपीला जामीन देण्याकरता 5 लाखांची लाच घेतल्याचा न्यायाधीश धनंजय निकम यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता. दरम्यान, सातारा सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्याच्या निर्णयाला न्यायाधीश महोदयांनी हायकोर्टात दिलेलं आव्हान याचिका आता फेटाळण्यात आलं आहे.
न्यायाधीशांनी त्यांचे निकटवर्तीय खरात बंधूंमार्फत लाच मागितल्याची एसीबीकडे तक्रार आली होती. न्यायाधीश निकम यांनी सारे आरोप फेटाळले असले तरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात निकमांचा यात सहभाग असल्याचे पुरावे हायकोर्टानं ग्राह्य धरले आहे. परिणामी या प्रकरणात न्यायाधीशांना मुंबई हायकोर्टाने झटका दिला आहे.
ही बातमी वाचा: