परभणी: जिल्हाधिकाऱ्यांचे पीए असल्याचं सांगत एका भामट्याने परभणीतील कापड व्यापाऱ्याला दोन लाखांचा गंडा घातल्याचं समोर आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात असतानाच या व्यापाऱ्याचे दोन लाख 10 हजार रुपये घेऊन या भामट्याने पोबारा केल्याचं समोर आलं आहे. व्यापाऱ्याला फसवणारा हा भामटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
आपण जिल्हाधिकाऱ्यांचे पीए असल्याचे सांगत जिल्हाधिकाऱ्यांना कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांसाठी कपडे घ्यायचे आहेत असे म्हणत या भामट्याने एका कापड व्यापाऱ्याचा विश्वास संपादन केला आणि त्याला तब्बल 2 लाख 10 हजार रुपयांना गंडा घातला. थेट जिल्हाधिकारी कार्यालयातून पैसे घेऊन हा भामटा पसार झाला.
परभणी शहरातील शगुन कलेक्शनचे मालक कैलास तुलसानी यांच्या दुकानात गुरूवारी दुपारी एक जणाने आपण जिल्हाधिकारी यांचा पीए असल्याचं सांगत त्यांना एक मोठी ऑर्डर दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी काही कपडे घ्यायचे आहेत असं त्या व्यापाऱ्याला सांगितले. त्या अनुषंगाने तुलसानी यांनी त्यांच्या नोकराकडे दोन ड्रेस या भोगस पीएससह घेऊन पाठवले.
त्यांने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन दुकानाच्या कर्मचाऱ्यासमोर आपण इथलेच जिल्हाधिकाऱ्यांचे पीए असल्याचे भासवले आणि जिल्हाधिकाऱ्यांना हे कपडे पसंत आल्याचं सांगितलं. त्या भामट्याने परत त्या व्यापाऱ्याच्या दुकानात जाऊन 45 ड्रेस सोबत घ्या, याचे बिल हे 90 हजार झाले असून जिल्हाधिकारी यांच्याकडे 2000 च्या नोटा आहेत, त्यांना 500 रुपयांच्या नोटा हव्यात असं भासवून आणि त्या व्यापाऱ्याला काही रक्कम घेऊन चला असंही सांगितलं.
तो भामटा व्यापारी मनोज तुलसानी यांना दोन लाख 10 हजार रुपये घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन गेला त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर आपण जिल्हाधिकारी यांना भेटून येतो असं सांगितलं. तसेच त्या व्यापाऱ्याकडील रक्कमही त्याने आपल्याकडे घेतली.
त्या व्यापाऱ्याकडील दोन लाख 10 हजारांची रक्कम घेतल्यानंतर तो भामटा फोनवर बोलत असल्याचं सांगत बाजूला गेला आणि पोबारा केला. बराच वेळ झाला तरी तो पीए येत नसल्याचं दिसताच आपण फसवलं गेल्याचं त्या व्यापाऱ्याच्या लक्षात आलं. त्याने आजूबाजूला चौकशी केली, जिल्हाधिकारी कार्यालयातही चौकशी केली, त्यानंतर भेटायला आलेला तो व्यक्ती हा जिल्हाधिकाऱ्यांचा पीए नसून भामटा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
त्यानंतर या व्यापाऱ्याने पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंद केली. पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे सीसीटीव्ही तपासले आणि त्यामध्ये हा भामटा कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस आता या भामट्याचा शोध घेत आहेत.