Manoj Jarange Patil Ultimatum To Government : मराठा आरक्षण (Maratha Reservation) निर्णय जाहीर करण्यासाठी सरकारकडे (Maharashtra Government) शेवटचे दोन दिवस आहेत, दोन दिवसात निर्णय करा, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. ''एकजूट फुटू देऊ नका, इथे ना तुमचा फायदा, ना माझा फायदा. घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरांचा हा फायदा आहे. तुमची लेकरं मोठी होणार, तुमच्या लेकरांना न्याय मिळणार मागे हटू नका. आंदोलन शांततेत करा. मराठ्यांनो ताकदीने एकत्र या', असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठ्यांना केलं आहे. 


''माझ्या खांद्याला खांदा लावून लढा''


''नेत्याला जातीपेक्षा मोठं मानू नका, जात संकटात सापडली, पोरंही संकटात सापडली आहेत. भानावर या. आपल्या लेकरांपेक्षा आपल्याला मोठं कुणीही नाही. मी तुमच्यासाठी माझा जीव पणाला लावलाय. मला तुमच्या साथीची गरज, तुमचं पाठबळ मला हवं आहे, तुमच्या आर्शिवादाची मला गरज आहे. तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावू लढायला हवं, मी मरणाला भीत नाही. सरकारने मला शत्रू मानायला सुरुवात केली, मी त्यांना भीत नाही,'' असं जरांगेंनी म्हटलं आहे. मी काय चूक केली, मी गरीब मराठ्यांच्या वेदना मांडल्या, असा सवाल जरांगे यांनी उपस्थित केला आहे.


आता कायदा पारित करायला अडचण काय?


जरांगे यांनी पुढे म्हटलं की, याआधी सरकारला तीन महिने वेळ दिला, समिती गठीत झाली, तेव्हा काही झालं नाही. पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ आलं, 30 दिवसांचा वेळ मागितला 40 दिवसांचा वेळ दिला. पुन्हा आले, पुन्हा बोलले, मागणीप्रमाणे आरक्षण हवं तर आधार लागतो. पुन्हा समिती नेमली, समितीला नोंदी सापडल्या. आता तुम्हाला कायदा पारित करायला अडचण काय, असा सवाल जरांगेंनी विचारला आहे.


''देव जरी खाली आला तरी आरक्षणाशिवाय राहणार नाही''


''मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून कुणीच रोखू शकत नाही. देव जरी खाली आला तरी, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही. आता मराठ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. सरकारने एकाला अट केली की, सर्वांनी तुरुंगात जायचं. सरकारने हे गांभीर्याने घेण्याची गरज नाहीतर, जड जाईल,'' असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला आहे.


शासकीय नोंदी सापडूनही मराठ्यांना का आरक्षण नाही?


सरकारने आता भानावर यावं. शासकीय नोंदी सापडूनही मराठ्यांना आरक्षण का नाही. गायकवाड आयोगाने मराठ्यांना 12 ते 13 टक्के मागास सिद्ध केलंय. सगळे निकष असूनही मराठ्यांना आरक्षण का नाही, असा प्रश्न जरांगेंनी उपस्थित केला आहे. तुम्हाला नोटिसा द्यायला काय होतंय. मराठ्यांनी ठरवलं तर आयुष्यभर तुम्हाला गुलाल लागू देणार नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maratha Reservation : जरांगेंचा रोख कुणाकडे? आरक्षणाच्या आड येणाऱ्यांची लवकरच नावं सांगणार, त्यांना गुलाल लागू देणार नाही; जरांगेंचा रोख कुणाकडे?