Parbhani : राज्यात शुक्रवारी सर्वत्र बैल पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतांना, परभणी जिल्ह्यात मात्र या सणाला गालबोट लागले आहे. पोळ्याच्या बैल मिरवणुकीत बैल मागे घेण्याच्या वादातून परभणीत दोन ठिकाणी लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ज्यात आठ जण जखमी झाले असुन, दोन्ही ठिकाणी पोलिसांनी तब्बल 53 जणांवर गुन्हा दाखल केलाय.यावेळी घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. 


शुक्रवारी पोळा सर्वत्र सण साजरा केला जात असताना, धुमधडाक्यात बैलांची मिरवणूक काढली जात होती. मात्र परभणीच्या पाथरी शहरातील पामे गल्लीजवळ दोन मिरवणुका समोरासमोर आल्याने बैल मागे घेण्यावरून वाद झाला. त्यानंतर या वादाचे रूपांतर क्षणार्धात थेट लाठ्याकाठ्यांनी मारहाणीत झाले.  यात दोन्ही गटातील पाच-सहा जण जखमी झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी 30 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 


दुसऱ्या घटनेत अर्धा तास सुरु होता राडा...


पाथरीत झालेल्या या घटनेनंतर दुसरी घटना जिंतुर तालुक्यातील चांदज येथे घडली आहे. गावात पोळ्याची मिरवणुक सुरू असताना मंदिर परिसरात गावातीलच दोन गटातील अनेक जण एकमेकांवर तुटुन पडले. त्यानंतर दगडफेक, काठ्या आणि लाठ्यांनी एकमेकांना मारहाण सुरू झाली. जवळपास अर्धा तास गावात हे दोन्ही गट एकमेकांविरोधात आमने-सामने आलेले होते. यात 2  जखमी झाले आहे. याबाबत माहिती मिळताच बोरी पोलिसांना तात्काळ गावात धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटांना शांत करत परिस्थिती आटोक्यात आणली. दरम्यान दोन्ही गटाकडून देण्यात आलेल्या फिर्यादीवरून बोरी पोलीस ठाण्यात 23 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पोलिसांचा बंदोबस्त...


पाथरी शहरातील पामे गल्ली आणि जिंतुर तालुक्यातील चांदज येथे झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी दोन्ही ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. विशेष म्हणजे दोन्ही ठिकाणी पोलिसांनी तात्काळ पोहचत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे मोठा वाद टळला आहे. पोलिसांनी गुन्हे दाखल करत वाद घालणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच दोन्ही ठिकाणी वाद झालेल्या घटनास्थळी बंदोबस्त वाढवला आहे. तर गावातील लोकांना शांतता राखण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


महत्वाच्या बातम्या...


Parbhani News : परभणीतील तरुण उद्योजकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, बॅडमिंटन खेळून बसल्यानंतर कोर्टवरच हार्ट अटॅक


Parbhani : चालत्या बसची चाक निखळली, सुदैवाने अनर्थ टळला; परभणीतील वसमत रस्त्यावर घडला गंभीर प्रकार