Mahayuti Meeting : राज्यभरात आज महायुतीमधील पक्षांचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान, परभणीत (Parbhani) देखील महायुतीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. भाजप, अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी अन ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग यावेळी पाहायला मिळाला. दरम्यान, याचवेळी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार बाबाजानी दुर्राणी (Babajani Durrani) भाषणाला उठताच जय श्रीरामची घोषणाबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. एका बाजूला बाबाजानी यांचे समर्थनात तर दुसरीकडे जय श्रीराम अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने परभणीत महायुतीच्या भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे, अन राष्ट्रवादी अजित पवार गट या तीनही पक्षांचा मिळून जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला तीनही पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती. यावेळी नेत्यांनी एकमेकांना तिळगुळ भरवून लोकसभा निवडणुकीत तिकीट कोणालाही जागा मिळो, मात्र महायुतीचाच उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. महत्त्वाचं म्हणजे या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबाजानी दुर्राणी हे भाषणासाठी उठताच एका बाजूने त्यांच्या नावाने घोषणाबाजी सुरूच झाली, तर दुसऱ्या बाजूने जय श्रीरामचा नाराही जोरदारपणे देण्यात आला. त्यामुळे खरंच महायुती मधील नेत्यांसह तीनही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हा प्रकार घडल्यानंतर बाबाजानी यांनीही आम्हाला आता फक्त ऐकून घेण्याची सवय झाल्याचं सांगितल.
लातूरमध्ये देखील महायुतीचा मेळावा...
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लातूरमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या सर्व मित्र पक्षांमध्ये समन्वय निर्माण व्हावा यासाठी नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा एकत्रित बैठक मेळावा आयोजित करण्यात आला होता. याचे, नेतृत्व कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांच्याकडे देण्यात आले होते. परभणीतल्या मेळाव्यास संजय बनसोडे जाणार होते. मात्र, पक्षश्रेष्ठी यांनी दिलेल्या आदेशामुळे त्यांनी लातूर येथील मेळाव्यात सहभाग घेतला. यावेळी भाजपाचे खासदार सुधाकर शिंगारे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार विक्रम काळे यांच्यासह भाजपातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मेळाव्याला हजेरी लावली होती. वैयक्तिक काम असल्याकारणाने निलंगाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे कार्यकर्ता मेळाव्याला हजर नव्हते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती मेळाव्यात नेत्यांची टोलेबाजी...
परभणी, लातूर प्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात देखील आज महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी केंद्रीय मंत्री भागवत कराड, रामदास आठवले, मंत्री संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, अतुल सावे यांच्यासह तीनही पक्षाचे स्थानिक आमदार उपस्थित होते. विशेष म्हणजे मेळाव्यात नेत्यांनी एकमेकांना टोले लगावत जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मनोमीलनसाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात नेत्यांच्या कोपरखळ्याचीच अधिक चर्चा झाली.
इतर महत्वाच्या बातम्या:
संदिपान भुमरेंना 15 टक्के द्यावे लागते, सोसायटीच्या चेअरमनने अब्दुल सत्तारांसमोरच केली 'पोलखोल'