परभणी : राज्यातील 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी कसोटीचा काळ जवळ आला असून पुढील काही दिवसांत परीक्षांना (Exam) सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभाग कामाला लागला असून कॉपीमुक्त अभियानासाठी प्रशासनाने कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे कॉपीमुक्त परीक्षेसाठी संवदेनशील केंद्रांवर ड्रोनद्वारे करडी नजर ठेवली जाणार आहे. दहावी आणि बारावी बोर्ड (HSC) परीक्षा दरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोनद्वारे जिल्हा प्रशासनाचे लक्ष असणार आहे. बोर्ड परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशासनाकडून व्हिडिओ चित्रीकरणही केलं जाणार आहे. प्रशासनाकडून त्या दृष्टीने तयारी सुरू असून शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य, उपप्राचार्य व स्टाफ कार्यरत झाला आहे. तत्पू्र्वी प्रशासनाला एका महाविद्यालयातील प्राचार्यांनी हत्यारबंद पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली आहे. अन्यथा आमचा संतोष देशमुख होईल, अशी भिती त्यांनी व्यक्त केली आहे. 

अवघ्या 4 दिवसांवर बारावीची परीक्षा आली आणि याच अनुषंगाने राबविण्यात येत असलेल्या कॉपीमुक्त अभियानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. परभणीतील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे उपप्राचार्य विजय घोडके यांनी आम्हाला कॉपीमुक्त अभियान राबवायचं आहे. केंद्र संचालक म्हणून ज्या सेंटरवर जायचे आहे, तिथे हत्यारबंद बंदोबस्त द्या अन्यथा आमचा संतोष देशमुख होऊ शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केलीय. घोडके यांच्या या वक्तव्यामुळे परीक्षा केंद्रावरील शिक्षक आणि केंद्रप्रमुखांवर देखील किती मोठा दबाव असतो, त्यांनाही किती भीती असते याचा अंदाज लावता येईल. 

छत्रपती संभाजी नगर येथे विभागीय शिक्षण मंडळात परभणी, हिंगोली, बीड, जालना आणि संभाजीनगर या 5 जिल्ह्यातील बारावी परीक्षांच्या केंद्र संचालकांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत मंडळाच्या सचिव वैशाली जामदार यांच्यासमोर घोडके यांनी हा विषय मांडला. घोडके यांनी व्यक्त केलेल्या भीतीमुळे परीक्षा केंद्रावरही कशाप्रकारे दहशत पसरवली जाते, कशारितीने गुंडगिरी दाखवली जाते याचा अंदाज बांधता येईल. दरम्यान, परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला असतो, पण पोलिसांचा हा बंदोबस्त हत्यारबंद पोलिसांचा असावा अशी मागणी जोर धरत आहेत. कारण, परीक्षेतील केंद्र प्रमुखांनाही गुंडगिरी व दहशतीची भीती वाटते आहे. 

परीक्षेत कॉपी केल्यास थेट फौजदारी गुन्हा

दरम्यान, परीक्षेत कॉपी कराल तर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा निर्णाय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. दहावी-बारावी परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर थेट दखलपात्र आणि अजामिन पात्र फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. सन 1982 च्या कॉपी विरुद्ध कायद्यानुसार विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.  बोर्डाचे नियम न पाळल्यास विद्यार्थ्यांवर थेट कारवाई होणार असल्याचेही गोसावी यांनी म्हटलं आहे. 

परीक्षा केंद्रावर ड्रोन आणि FCR 

दरम्यान, राज्य शासनाकडून कॉपीमुक्त अभियनासाठी परीक्षा केंद्रावर ड्रोन फिरवले जाणार आहेत. परीक्षा केंद्रावर नियुक्त केलेल्या केंद्रसंचालक, पर्यवेक्षक व परीक्षेशी संबंधीत घटकांची (FCR) Facial Recognition System व्दारे म्हणजे फेस रिडींगद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या बोर्ड परीक्षेत कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी बोर्डाकडून विशेष सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा

धक्कादायक! पुण्यातील PSI ने उचललं टोकाचं पाऊल; टायगर पाईंटजवळ आढळली कार, कारमध्ये डायरी