परभणी : जिल्ह्याच्या सोनपेठ (Parbhani) तालुक्यातील व्टेंन्टीवन शुगर या कारखान्यावर बेमुदत धरणे आंदोलनास कारखाना प्रशासन जुमानत नसल्याचे पाहून आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोडून आत प्रवेश केला. त्यामुळे, येथील कारखान्यावर सुरू असलेल्या ऊस दराच्या शेतकरी (Farmer) आंदोलनाचा भडका उडाल्याचं पाहायला मिळालं. सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील व्टेंन्टीवन शुगर या कारखान्याने या वर्षीची पहिली उचल 3 हजार रुपये जाहीर करावी. तसेच गेल्यावर्षी गाळप केलेल्या ऊसाला जाहीर केल्याप्रमाणे सत्तावीशे रुपये प्रति टन भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज गेटवर ठिय्या आंदोलन केले. किसान सभेच्या डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. 

Continues below advertisement

कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघनेचे नेते राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते, यावेळीही शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आता, परभणी जिल्ह्यातील सोनपेठे येथेही ऊस दराच्या आंदोलनावर शेतकरी आक्रमक झाले आहेत. येथील ट्वेंटीवन साखर कारखान्यामुळे होत असलेल्या प्रदुषणावर नियंत्रण ठेवावे या व इतर मागण्यांसाठी परीसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आजपासून कारखान्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. सकाळपासून कारखान्याबाहेर उन्हात बसलेल्या शेतकऱ्यांना कारखाना प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर, सहा तासांपेक्षा अधिक काळ होऊनही प्रतिसाद न मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कारखान्याचे गेट तोडून कारखाना परीसरात प्रवेश केला व कारखान्याचे सर्वेसर्वा अमित देशमुख यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर, कारखाना प्रशासनाकडून आंदोलकांच्या शिष्ट मंडळांसोबत चर्चा करण्यात आली. पण चर्चेत प्रशासनाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे पैसै देण्यात असमर्थता दर्शविल्याने चर्चा फिसकटली. त्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना गेटवर बेमुदत धरणे सुरुच ठेऊन कारखान्याचे सर्वेसर्वा अमित देशमुख यांच्या लातूर येथील घरासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.

दरम्यान, या आंदोलनात किसान सभेचे डॉ अजित नवले,राज्य अध्यक्ष उमेश देशमुख ॲड माधुरी क्षिरसागर,किशोर ढगे,ॲड अजय बुरांडे,लक्ष्मण पौळ बालाजी कडभाने विश्वंभर गोरवे, हेमचंद्र शिंदे, शिवाजी कदम श्रीराम बडे,ओंकार पवार,वसंत राठोड,दिपक लिपीचे,दत्ता गव्हाणे,सुदाम शिंदे, सुधीर बिंदू,गणेश पाटील, रामेश्वर मोकाशे,सुरेश इखे,ॠषीकेश जोगदंड, भगवान जोगदंड यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे दिसून आले. 

Continues below advertisement

हेही वाचा

अन्यथा संपूर्ण निवडणुका 'स्थगित' कराव्या लागल्या असत्या; निवडणुका आयोगाकडून पहिल्यांदाच स्पष्टीकरण