Agriculture Minister Abdul Sattar : राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि राज्यभरात शिंदे गटाचे पदाधिकारी नेमण्यात आले. मात्र काही महिन्यातच या शिंदे गटात ही स्थानिक पातळीवर मोठे मतभेद पाहायला मिळत आहेत. परभणीत शनिवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार 'हिंदू गर्व गर्जना' यात्रेनिमित्त येत आहेत. मात्र तत्पूर्वीच परभणीत स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वितुष्ट निर्माण झालं आहे. शहरात कार्यक्रम होत असताना शिंदे गटाचे महानगराध्यक्ष प्रवीण देशमुख यांनाच याची माहिती नसून परस्परच हे कार्यक्रम आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे..
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून वेगळे होते एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडली. त्यांनतर जिल्ह्याजिल्ह्यात संपर्क प्रमुखांसह जिल्हाप्रमुख, महानगरप्रमुख आदी पदाधिकारी नेमण्यात आले. परभणीत सुरुवातीला माजी खासदार सुरेश जाधव यांनी ते जिल्हाप्रमुख झाल्याचे जाहीर केले. यानंतर पक्षाने माधव कदम यांना जिल्हाप्रमुख पद दिले. ज्याने त्यावेळी नेमके जिल्हाप्रमख कोण? यावरून चर्चा रंगल्या होत्या. त्यांनतर पुन्हा एकदा जिल्हाप्रमुख म्हणून व्यंकट शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. पुन्हा या गटाच्या जिल्हा प्रमुख पदाबाबत चर्चांना ऊत आला. यानंतर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून सुरेश जाधव यांची निवड करण्यात आली व इतर पदाधिकारी नेमण्यात आले. ज्यात परभणी महानगराध्यक्षपदी प्रवीण देशमुख यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्ह्याची इतर कार्यकारिणी ही निवडली गेली, मात्र काही दिवसांतच या सर्व कार्यकारिणी मध्ये एकमेकांना विचारण्यावरून वितुष्ट निर्माण झालं आहे. त्यातच शनिवारी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोऱ्यात अंतर्गत वाद समोर येण्याची शक्यता आहे.
पक्षाचा महानगराध्यक्ष असताना परस्परच कार्यक्रम, नियुक्त्या शाखांचे उद्घाटन केले जात आहे-प्रवीण देशमुख
मी शिवसेना शिंदे गटाचा महानगराध्यक्ष असून मला विचारात न घेताच शहारत कार्यक्रम घेतले जात आहेत. शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जात आहेत. तसेच कृषी मंत्री येत असताना मला न सांगता विचार विनिमय न करता कार्यकर्ता मेळावा घेतला जातोय. मी पहिल्यापासून शिंदे साहेबांचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून मला वादात जायचे नाही. पण महानगराध्यक्ष असताना साधे या पदाधिकऱ्यांनी विचारात घेऊ नये, ही बाब पक्षाच्या बाबतीत चांगली नसून मी याबाबत पक्षातील वरिष्ठांशी तक्रार करणार आहे. मी व माझे सर्व पदाधिकरी उद्या कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन सत्कार करणार आहोत. परंतु कार्यक्रमाला जाणार नसल्याची प्रतिक्रिया शिवसेना(शिंदे गट)महानगराध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय..
ती त्यांची वैयक्तिक भुमिका असू शकते-आम्ही सर्व एकत्रच -संपर्कप्रमुख सुरेश जाधव
शिंदे गटातील बेबनावाच्या पार्श्वभूमीवर आम्ही संपर्कप्रमुख सुरेश जाधव यांची प्रतिक्रिया घेतली. त्यांनी आम्ही सर्व जण एकत्रच आहोत, छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, आता त्यांनी जी भूमिका घेतलीय ती त्यांची वैयक्तिक भूमिका असेल, अशी प्रतिक्रिया दिली. मी त्यांच्याशी दोन वेळा बोललोय आम्ही सर्व जण कुटुंब म्हणून काम करतोय आणि करत राहू, आमच्यात कुठलाही बेबनाव नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.