मुंबई : माझ्यावर अशी टीका होते की वडिलांमुळे मला हे सगळं मिळालं. त्यामुळं मला शून्यावर जाऊन पुन्हा काम करायचं आहे. मला आता स्वतःला पाहायचं आहे. मी किती मुंडे साहेबांमुळं आहे आणि किती स्वत:च्या कामामुळं. मी स्वतःला आधीच सिद्ध केलं आहे मात्र पुन्हा शून्यावर जाऊन काम करुन स्वत:ला सिद्ध करायचं आहे, अशा भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मुंडे यांनी विविध विषयांवर संवाद साधला. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. गोपीनाथगडावर झालेल्या भाषणानंतर त्यांनी पहिल्यांदाच संवाद साधला.
मुंडे यावेळी म्हणाल्या की, मी नाराज नाहीच. मला आता स्वतःला पाहायचं आहे. यावेळी त्यांनी अमिताभ बच्चन यांचं उदाहरण दिलं. त्या म्हणाल्या की अमिताभ बच्चन यांच्या मुलें कितीही चांगला अभियान केला तरी त्याला अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे हीच ओळख मिळते, असे त्या म्हणाल्या.
त्या म्हणाल्या, मी आमदार झाले नाही पण माझ्यामुळे अनेक आमदार झाले याचा आनंद आहे. मी फेसबुकवर पोस्ट लिहिली त्यावेळी माजी मंत्री लिहू नका असं मी सांगितलं होतं. ट्विटर हँडलवर कधी कमळ नव्हतं, त्यामुळं कमळ त्यावेळीच नव्हतं असं म्हणणं चूक आहे. त्यावेळी माझ्या मनात खदखद नव्हती, आता आपण आमदारही नाहीत. त्यामुळं पुढे काय करायचं हे ठरवायचं होतं त्यासाठी ती पोस्ट लिहिली होती, असे त्या म्हणाल्या. मी पक्ष सोडण्याच्या वावड्या का कुठल्या माहिती नाही, मी आजिबात तणावाखाली नाही पण अस्वस्थ आहे. मी पॉवर गम खेळतेय असं वातावरण तयार झालं. मी दबाव तयार करतेय अशी चर्चा झाली, असे त्या म्हणाल्या.
मुंडे म्हणाल्या की, मला त्या चर्चेला विराम द्यायचा होता. त्यामुळे कोअर कमिटीतून काढा असं म्हटलं. मला आता भाजप कार्यकर्ती म्हणून काम करायचं आहे. एनजीओच्या माध्यमातून काम करायचं आहे. मी बंड का करू, मी पक्ष का बदलू? असंही त्या म्हणाल्या. मी भाजप सोडणार नाही. भाजपने मला सोडायचं का नाही ते त्यांनी ठरवावं. मी कोअर कमिटीत आता मी जाणार नाही. मी हे पद स्वतःसाठी सोडलं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
माझं व्यक्त होणं हे नैसर्गिक आहे. मी अनेक छटा राजकारणाच्या पहिल्या आहेत. वडिलांच्या कर्तृत्वाचा प्रभाव माझ्यावर आहे. माझे वडील वारले त्यावेळी मी शून्यावर होते. आता माझ्यावर अशी टीका होते की वडिलांमुळे हे मिळालं. आता मला पुन्हा शून्यावर जायचं आहे. मला पाहायचं आहे की, काही नसताना मी काही मिळवू शकेल का?, असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. मी अन्याय झाला असं मी कधीच म्हटलं नाही. मी पराभवानंतर मी जबाबदारी स्वीकारली होती. पराभवाविषयी मी नाराज नाही. माझा झालेला पराभव माझा पराभव आहे कुणाचा विजय नाही, असे देखील त्या म्हणाल्या.
मला शून्यावर जाऊन पुन्हा काम करायचंय : पंकजा मुंडे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Dec 2019 05:43 PM (IST)
मला पुन्हा शून्यावर जाऊन काम करुन स्वत:ला सिद्ध करायचं आहे, अशा भावना भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या आहेत. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मुंडे यांनी विविध विषयांवर संवाद साधला. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. गोपीनाथगडावर झालेल्या भाषणानंतर त्यांनी पहिल्यांदाच संवाद साधला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -