पालघर : श्रावण सोमवारी निमित्त निघालेल्या कावड यात्रेतील दोन युवक आज तुंगारेश्वर नदीत (River) बुडाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  सचिन यादव (18 वर्षे ) आणि हिमांशू विश्वकर्मा (वय 18 वर्षे) अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही कॅालेजमध्ये शिक्षण घेणारे युवक आहेत. येथील नालासोपारा पूर्वेकडील श्रीराम नगर येथील राहणारे हे रहिवाशी आहेत. तर, पुण्यात (Pune) मातीच्या ढिगाऱ्याखाली 4 कामगार अडकले होते, त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची धक्कादाक घटना घडली आहे. तसेच, वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील खडकी येथे कार आणि ऑटोमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident) ऑटोमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Continues below advertisement

नालासोपारातून आज कावड यात्रेसाठी एक ग्रुप विरारच्या मांडवी येथे निघाला होता. त्यातील सहा जण वसईच्या तुंगारेश्वर येथे पोहचले आणि त्यातील एक जण येथील नदीत पाय घसरून पडला, त्याचा धक्का दुसऱ्याला बसल्याने दोघेही नदीत पडले. नदीत पडलेल्या दोघांना वाचवण्यासाठी तिसरा मुलगा प्रयत्न करत असताना तोही बुडाला. मात्र, सुदैवाने त्याला इतर मुलांनी वाचवले. मात्र, या दुर्घटनेत नदीत पडेलल्या दोन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दरम्यान, घडलेल्या घटनेची माहिती देत ही घटना दु:खद आहे. त्यामुळे, तरुणांनी किंवा कुणीही तुंगारेश्वर मंदिरात गेल्यानंतर पाण्याकडे जाऊ नये, अंघोळीसाठी पाण्यात उतरू नका, असे आवाहन जितेंद्र वनकोटी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे यांनी केले आहे. 

पुण्यात 4 कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले

पुण्यातील नांदेड सिटी भागात महानगरपालिकेच्या जायका प्रकल्पाचे काम सुरू असताना मातीचा ढिगारा अंगावर पडल्याने चार कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी तीन जणांना बाहेर काढले. मात्र, एका कामगाराचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुणे आणि पीएमआरडीए अग्निशमन आणि एनडीआरएफच्या मदतीने बचावकार्य करत तीन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, एकाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हे सगळे कामगार परराज्यातील होते. नांदेड सिटी पोलिसांकडून या सगळ्या घटनेची चौकशी केली जात आहे.

Continues below advertisement

कारची ऑटोला धडक; दोघे गंभीर जखमी

वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील खडकी येथे कार आणि ऑटोमध्ये झालेल्या भीषण अपघातात ऑटोमधील दोघे गंभीर जखमी झाले आहेत. वर्धा-नागपूर मार्गावर प्रवासी ऑटोने नागपूरच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या वॅगनॉर कारने ऑटोला धडक दिली. ऑटोच्या डिझेल टँकला धडक लागल्याने टँक रस्त्यावरच फुटला आहे. या अपघातात ऑटोमधील दोघे जखमी झाले असून चालक व एक प्रवासी सुखरूप आहे. कारचालकाचा ताबा सुटल्याने कार अनियंत्रित झाल्याने ती धडक झाली. दरम्यान, जखमींवर बुटीबोरी येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा

अंजली दमानिया हाजीर होss.. न्यायालयाकडून बी.डब्लू. वॉरंट जारी, 9 वर्षांपूर्वीचा खटल्यात बोलवण