वसई : पालघर जिल्ह्यातील वसई रोड येथे बुधवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात 60 वर्षीय वृद्ध आजोबांचा मृत्यू झाला असून त्यांचा 7 वर्षीय नातू गंभीर जखमी झाला आहे. ही घटना वसईच्या सनसिटी रोडजवळ घडली. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघात (Accident) करणारा दुचाकीस्वार मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मृत व्यक्तीचे नाव चंद्रकांत खाखम (वय 60) असून ते वसईचे रहिवासी होते. त्यांनी नुकतीच पंढरपूर यात्रा पूर्ण करून मुंबईला (Mumbai) परत आल्यानंतर आपल्या नातवाला भेटण्यासाठी वसई गाठले होते. बुधवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता त्यांनी आपल्या नातवाला, ध्रुव सिंह (वय 7) बागेत नेण्यासाठी दुचाकी बाहेर काढले. ते दोघे सनसिटी रोडजवळ पोहोचले असताना, एका भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली.
दुचाकीच्या भीषण अपघातात चंद्रकांत खाखम आणि ध्रुव दोघेही रस्त्यावर पडले व गंभीर जखमी झाले. त्याचवेळी धडक देणारा दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसलेली व्यक्तीही खाली पडून जखमी झाली. सर्व जखमींना तातडीने बालाजी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र चंद्रकांत खाखम यांना उपचार सुरू होण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले. ध्रुवच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची तयारी सुरू आहे, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.
मृताच्या नातेवाईक नरेंद्र खाखम यांनी सांगितले की, काका पंढरपूरहून परत आल्यानंतर त्यांनी नातवाला भेटण्यासाठी वेळ काढला होता. ते स्वतः दुचाकी चालवत होते, पण हेल्मेट घातले नव्हते. अपघात इतका भीषण होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला असून, दुचाकीस्वाराविरोधात अतिवेगात वाहन चालवून मृत्यू केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच संबंधित चालक आणि मागे बसलेल्या व्यक्तीने मद्यपान केले होते का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.