Vadhavan Port: पालघर तालुक्यातील डहाणूमधील वाढवण बंदर (Vadhavan Port) उभारण्यासाठी शासनाने जय्यत तयारी सुरु केली आहे. वाढवण बंदरासाठी रस्ता तसेच रेल्वेसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर येत आहे. वाढवण बंदराजवळ मोठं टेक्सटाईल पार्क (Textile Park) उभारण्यासाठी हालचाली सुरु आहे. यासाठी पालघर जिल्ह्यातील 1200 एकर जमीन भूसंपादन केली जाणार आहे.
पालघर जिल्ह्यातील माहीम आणि टोकराळे गावातील जमीन भूसंपादन करण्यात येणार आहे. यासाठी बांधकाम विभाग आणि एमआयडीसी विभागाच्या अधिकारी यांचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. वाढवण बंदराच्याजवळ (Vadhavan Port) हा प्रकल्प उभा केल्याने निर्यातीसाठी सुलभता येणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र हा प्रकल्प खाजगी उद्योजक चालवणार की सरकार यात अद्याप स्पष्टता नाही. या टेक्सटाइल पार्कसाठी मोठे रस्ते बांधण्यासाठी ही बांधकाम विभागाच्या हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पासाठी 65 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असुन नविन पाण्याचे बंधारे ही बांधले जाणार आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या बैठका-
पालघर तालुक्यात दुग्ध व्यवसाय विभागाकडे टोकराळे (केळवे रोड) येथील सर्वे नंबर 6,8,10,11,12 अ,13,14,31,33 व 34 मधील 112 हेक्टर व माहीम गाकतील सर्व्हे नंबर 835/1 (63 हेक्टर) व 836 (111 हेक्टर) या जागांसह लगतच्या भागातील शासकीय जागांमध्ये टेक्स्टाइल पार्क उभारण्याचे विचाराधीन आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात एमआयडीसी, पाटबंधारे विभाग, वन विभाग, महावितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याच्या बैठका होत असून विभागनिहाय स्थळपाहणीही करण्यात आली आहे.
कोस्टल रोड वाढवण बंदराला जोडणार?
मुंबईतील कोस्टल रोड (Coastal Road) वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा मानस असल्याचं सांगण्यात येत आहे. पालघरमध्ये विमानतळ बांधण्याबाबत जमिन आणि (Feasibility Report) साध्यता अहवाल एकनाथ शिंदेंकडून मागवण्यात आली आहे. वाढवण बंदर, विमानतळ आणि कोस्टल रोडशी जोडल्यास तिथे कनेक्टिविटी वाढून त्या भागाचा विकासही मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे.
वाढवण बंदर प्रकल्प नेमका काय?
सध्या महाराष्ट्रात दोन प्रमुख बंदरं आहेत. यातील एक मुंबई बंदर आणि दुसरं जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट बंदर. मात्र जेएनपीटीएने मुंबई शहराचा विकास आणि काही भौगोलिक कारणांमुळे या बंदरात अधिकची वाहतूक करणं शक्य नाही. तसेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टची कंटेनर हाताळण्याची क्षमताही संपत चालली आहे, असे सांगितले आहे. तसेच देशातील निर्यात व आयात क्षेत्रात होणारी वाढ पाहता भविष्यात दुसऱ्या बंदराची गरज लागू शकते. त्यामुळेच पालघर जिल्ह्यातील वाढवण परिसरात एक नवीन बंदर उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सागरी मंडळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट या दोन संस्था एकत्र काम करत आहे.
संबंधित बातमी:
कोस्टल रोड वाढवण बंदरापर्यंत नेण्याचा सरकारचा विचार; विमानतळही बांधणार, एकनाथ शिंदेंनी मागवला अहवाल