पालघर : वसईच्या नवपाडा परिसरात एका बंद घरात तिघांचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. आज (4 फेब्रुवारी) संध्याकाळी पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. तिन्ही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत होती. तिघेही वसईच्या आनंद नगर परिसरात फळ विक्री करायचे, तिघांची टोपन नावे आजम, राजू, छोटकू अशी असल्याची माहिती मिळाली आहे.


तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले 


वसई पश्चिमेला नवपाडा परिसरातील आशा चाळ येथे दुसऱ्या मल्यावरील घरातून सकाळपासून उग्रवास येत असल्याने तेथील रहिवाशांनी आज दुपारी माणिकपूर पोलिसांना तक्रार केली. पोलिसांनी घरातील दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, घरात तिघांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. मृतदेहाच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या. घरात गॅसचा उग्र वासही येत होता. 


प्राथमिक अंदाजानुसार या घरामध्ये गॅस चालू राहिला असावा आणि या बंद घरात ऑक्सिजनची कमतरता झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नक्की कारण कळण्याची शक्यता आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. अजूनपर्यंत तरी मयतांचे कुणी नातेवाईक समोर आले नाही. 


पालघरमध्ये अपघातांची मालिका सुरुच


दुसरीकडे, मागील तीन दिवसात पालघर तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या तीन अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांमध्ये आतापर्यंत सात जण जखमी झाले आहेत रविवारी 4 फेब्रुवारी रोजी सकाळी चहाडे-गुंदले रस्त्यावर टायर फुटून कार उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. त्यापूर्वी शुक्रवारी संध्याकाळी बोईसर चिल्हार रस्त्यावरील गुंदले दोन बंगला येथील क्रॉसिंगवर भरधाव स्कॉर्पिओ जीपने अचानक वळण घेणाऱ्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी बाळु हेमाडा यांचा वलसाड येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.


इतर महत्वाच्या बातम्या