पालघर : शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा (Srinivas Vanaga) यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.  श्रीनिवास वनगा हे गेल्या चार दिवसांपासून नॉट रिचेबल होते. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा तलासरीतील कवाडे येथील त्यांच्या राहत्या घरी परतले. आता यावर त्यांच्या पत्नी सुमन वनगा (Suman Vanaga) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.   


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पालघरमधून माजी खासदार राजेंद्र गावितांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेंसोबत गेलेले श्रीनिवास वनगा यामुळे नाराज झाले. श्रीनिवास वनगा जवळपास 100 तासापेक्षा नॉट रिजर्व होते त्यानंतर त्यांचे कुटुंबीय मोठ्या चिंतेत होते. कुटुंबीय आणि नातेवाईक मित्रपरिवार यांनी श्रीनिवास वनगा यांची मनधरणी करून त्यांना पुन्हा घरी माघारी आणले आहे. 


काय म्हणाल्या सुमन वनगा? 


याबाबत सुमन वनगा यांनी म्हटले आहे की, सर्व कुटुंबीयांनी त्यांना खूप समजावले. कुटुंबियांसाठी ते घरी सुखरूप आले. माझं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं झालं. ते श्रीनिवास यांची विचारपूस करत होते. आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून आशा आहे की ते श्रीनिवास यांना वाऱ्यावर सोडणार नाहीत. त्याचप्रमाणे शंभूराजे देसाई यांच्याशी बोलणं झालं असून त्यांनीही आश्वासित केल्याची माहिती सुमन वनगा यांनी दिली आहे.  



प्रामाणिक लोकांवर अन्याय होऊ नये : श्रीनिवास वनगा


मी प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकच राहणार आहे. शेवटपर्यंत मला आश्वासन देण्यात आली. मात्र माझं तिकीट रद्द करून उमेदवारी आयात उमेदवाराला दिली. मात्र माझी काय चूक होती?, मी लोकांची काम सातत्याने करत आहे. तरीही माझ्यावर हा अन्याय केला गेला, हे पूर्ण षडयंत्र होतं. माझं शंभूराजे देसाई यांच्याबरोबर बोलणंही झालं आहे, तेही प्रामाणिक आहेत. प्रामाणिकपणाचे फळ असं मिळतं का? मी जिद्दी आहे, प्रामाणिक आहे आणि पुढे माझ्या सामाजिक कामातून हे मी या षडयंत्र रचणाऱ्यांना दाखवून देईल. मी त्यांना सोडणार नाही. माझं काम मी कायमस्वरूपी करत राहील. मला भविष्य आहे. मी भावनेच्या भरात काही बोलले गेले असेल. मला बरंही वाटत नव्हतं आणि माझ्या मित्रांनी मला खूप सांभाळलं. परंतु माझा मुलगा आजारी होता असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे शेवटी आज मी घरी आलो. माझा परिवार आहे त्यांचीही मला काळजी आहे. परंतु अशा प्रामाणिक लोकांवर अन्याय होऊ नये असं मला वाटतं, असे श्रीनिवास वनगा यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


आता परिवर्तन होणार, मुस्लिम आणि बौद्ध धर्मगुरुंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंना विश्वास, 3 तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार