Palghar News : अंड्याच्या आडून विक्रीस बंदी असलेली बनावट दारुची तस्करी (Smuggling of liquor) होत असल्याची घटना समोर आली आहे. पालघर उत्पादन शुल्क विभागानं (Palghar Excise department) पर्दाफाश केला आहे. ही घटना पालघर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. मनोर वाडा रस्त्यावरील वाघोटे टोलनाक्यावर ही कारवाई केली आहे. यामध्ये तब्बल 18 लाख 3 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  


बानवट दारुसह 16800 प्लास्टिकची बनावट अंडीही जप्त 


अंड्याच्या आड महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेली दमन बनावटीची दारु अशी अनोखी शक्कल लढवून तिची तस्करी होत होती. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे ही दारुची तस्करी कोणाच्याही लक्षात येऊ नये म्हणून टेम्पोमध्ये समोरच्या बाजूस 560 बनावट प्लास्टिकच्या अंड्यांचे ट्रे ठेवण्यात आले होते. या 560 अंड्यांच्या ट्रेमधून 16800 प्लास्टिकची बनावट अंडी देखील जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणात दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाला अटक करण्यात आलं आहे. तर आणखी एक जण फरार असून त्याचा शोध सध्या उत्पादन शुल्क विभाग घेत आहे. 


आरोपीला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी 


दरम्यान, उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या या कारवाईमुळे दारुसह वाहतूक होणारी ही प्लास्टिकची बनावट अंडी नेमकी कोणत्या भागात विक्रीस जात होती हे अजूनही स्पष्ट झालं नाही. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 18 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पालघर हा दादरा नगर हवेली आणि दमन या केंद्रशासित प्रदेशांच्या सीमेवर असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणावर इथल्या मद्याची तस्करी होते. महाराष्ट्रात विक्रीस बंदी असताना सुद्धा चोरीच्या मार्गाने या दोन्ही केंद्रशासित प्रदेशातून मद्य आणलं जात असल्याचं वारंवार उघड होत आहे. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाने आता या दारु माफियांवर करडी नजर ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. 


तलासरीमध्ये अवैध मद्य वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई 


याआधी 9 मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाने पालघर जिल्ह्यातील तलासरी इथे कारवाई करत दमन बनवटीचं मद्य जप्त केलं होतं. या कारवाईत मद्याचे एकूण 400 बॉक्ससह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तसंच मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघाना अटक करण्यात आली होती. 


महत्त्वाच्या बातम्या:


Pune News : अवैध दारु विक्री आणि अवैध दारु सेवन करणाऱ्या विरुद्ध विशेष मोहीम; 29 जणांवर गुन्हे दाखल