Palghar News : पालघर (Palghar) आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी सुरु असलेला खेळ पुन्हा एकदा उघड झाला आहे. तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (Public Health Centre) एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक समोर आली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तातडीने या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी जिल्हा परिषद पूर्ण काळजी घेईल, असं आश्वासन देखील निकम यांनी दिलं आहे.


डॉक्टरांचा सल्ला न घेताच मद्यपी शिपायाकडून चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न


दादरा नगर हवेलीच्या वेशीवर असलेल्या तलासरी तालुक्यातील उधवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका मद्यपी शिपायाकडून एका चिमुकल्या मुलीवर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा मद्यपी शिपाई चक्क डॉक्टरचा सल्ला न घेताच या चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र रुग्णाच्या सोबत असलेल्या कुटुंबियांनी त्याला रोखून धारेवर धरलं. आपण मद्य प्राशन केलं असल्याची कबुली या व्हिडीओमध्ये या शिपायाकडून देण्यात आली असून या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. परंतु या रुग्णालयात काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावर दुर्लक्ष होते का हाही प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच अधिकारीही तेवढेच जबाबदार असल्याचा आरोप आता नागरिकांकडून करण्यात येत आहे. त्यांच्यावर कारवाई का नाही असा सवाल विचारण्यात येत आहे.


पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी खेळ


पालघर जिल्हा हा विस्तारलेला आदिवासीबहुल जिल्हा असून या जिल्ह्यात आधीपासूनच आरोग्य विभागाची लक्तरे वेशीला टांगल्यासारखेच आहे. या जिल्ह्यात ग्रामीण भागात असलेली आरोग्य केंद्र आणि आरोग्य उपकेंद्र याकडे शासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने सतत धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. आता आरोग्य केंद्रात मद्यपी शिपायाकडून चिमुकलीवर उपचार सुरु करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघड झाल्याने पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचं दिसत आहे. 


...तर आक्रमक भूमिका घेऊ : माकपचे आमदार विनोद निकोले यांचा इशारा


पालघर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर राहत असल्याची ओरड नेहमीच होते. मात्र पालघर जिल्हा परिषद प्रशासन आणि सरकार यावर ठोस कारवाई करण्यात अजूनही अपयशी ठरत असल्याचं वारंवार समोर येत आहे. हा प्रकार उघडकीस आल्या नंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी तातडीने या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच असे प्रकार पुन्हा घडू नये यासाठी जिल्हा परिषद पूर्ण काळजी घेईल असं आश्वासन देखील निकम यांनी दिले आहे. तर पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाचा आजही बोजवारा उडाला असून या जिल्ह्यात काम करणारे वैद्यकीय अधिकारी हे मुंबईत कुठल्यातरी ठिकाणी राहून इथला पगार घेतात असा आरोप करत या सगळ्यावर सरकार कारवाई करणार नसेल तर लवकरच आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोले यांनी दिला आहे.