पालघर : महाराष्ट्रातील विधानसभेचे बिगुल वाजले असून आता चर्चा सुरू झाली आहे ती उमेदवारीच्या चाचपणीची. पालघर लोकसभेत सहा विधानसभा मतदार संघ येत असून यामध्ये डहाणू, पालघर, विक्रमगड, बोईसर, वसई आणि नालासोपारा या मतदारसंघांचा समावेश आहे. 2019 च्या निवडणुकीत डहाणू विधानसभा क्षेत्रामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांनी भाजपाचे दिवंगत आमदार पास्कल धनारे यांचा पराभव केला होता. तर पालघर विधानसभेत शिवसेनेचे श्रीनिवास वनगा विजयी झाले होते. 


विक्रमगड मतदारसंघात सध्याचे खासदार असलेले डॉ. हेमंत सावरा यांचा राष्ट्रवादीचे सुनील भुसारा यांनी पराभव केला होता. बोईसर विधानसभेवर आता भाजपामध्ये असलेले शिवसेनेकडून लढलेले विलास तरे यांचा बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील यांनी पराभव केला होता. तर वसई मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर निवडून आले होते आणि नालासोपारा मतदारसंघात बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी विजयश्री खेचून आणली होती. 
       
नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीने विधानसभेच्या सर्वच मतदारसंघात चांगलं मतदान पदरात पडलं असल्याने या सर्वच विधानसभा मतदारसंघात आम्हीच विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. वरिष्ठांनी सर्वच कार्यकर्त्यांना जो उमेदवार निश्चित होईल त्याचेच काम करावं लागेल असा आदेश दिला असला तरीही शिवसेना शिंदे गट आणि भाजपाचे कार्यकर्तेही सध्या विखुरल्याचे चित्र आहे. 


भाजपामध्ये काही गट तट निर्माण झाले असून शिवसेना शिंदे गटातील मोठे गटबाजी असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांना या सर्व कार्यकर्त्यांची समज घालण्यासाठी मोठे कसरत करावी लागेल असे चित्र सध्या या सर्वच विधानसभा मतदारसंघात आहे. एकीकडे मागील निवडणुकीत बहुजन बहुजन विकास आघाडीचे तीन आमदार निवडून आले होते. शिवसेना, राष्ट्रवादी, माकपा यांचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला होता. तर भाजपाची पाटी कोरीच होती. 


आता होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने विचार करायला गेलं तर भाजपाचं गणित पक्क झालेलं दिसून येत असून तेवढ्याच ताकतीने शिवसेनाही मजबुतीने रणांगणात उतरणार असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये एकसंघतेचा अभाव अजूनही दिसून येत असून सध्या फोडाफोडीच राजकारणही पाहायला मिळत आहे. 


सूत्रांच्या माहितीनुसार पालघर आणि बोईसर हे दोन मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाणार असल्याचं सांगितलं जातंय. विक्रमगड, नालासोपारा आणि डहाणू हे मतदारसंघ भाजपाच्या कोट्यात जाण्याची शक्यता आहे. 
           
पालघर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून सध्याचे आमदार श्रीनिवास वनगा यांना पुन्हा उमेदवारी देण्याचे संकेत असून या ठिकाणी शिंदे गटाकडून श्रीनिवास वनगा यांच्या सोबतच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण ह्या इच्छुक आहेत. तर बोईसर विधानसभेसाठी शिवसेना शिंदे गटाकडून जगदीश धोडी यांची मागणी असून नुकताच शिवसेना शिंदे गटांमध्ये प्रवेश केलेल्या बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर यांनाही पुढे केले जात आहे. 


बहुजन विकास आघाडीकडून सध्याचे आमदार राजेश पाटील यांचेच नाव चर्चेत आहे. याच ठिकाणी भाजपाचे विलास तरे यांचीही मागणी आहे. डहाणू विधानसभा मतदारसंघासाठी भाजपाकडून विनोद मेढा ,सुरेश शिंदा, लुईस काकड इच्छुक असून माकापाकडून सध्याचे आमदार विनोद निकोले यांची वर्णी लागणार आहे. तर राष्ट्रवादीचे काशिनाथ चौधरी ही महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. मनसेही आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. 


विक्रमगड विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर राष्ट्रवादीकडून सध्याचे आमदार सुनील भुसारा यांचं नाव निश्चित असून भाजपाकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले, भाजपाच्या सक्रिय कार्यकर्त्या ज्योती भोये, भाजपाचे जेष्ठ नेते हरिचंद्र भोये इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून सध्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम ही इच्छुक आहेत. 


नालासोपारा मतदारसंघाचा विचार केला तर बहुजन विकास आघाडीमधून सध्या जे भाजपाकडे जाण्याची तयारी करत आहेत त्या राजीव पाटील यांची उमेदवारीसाठी वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर वसई हा मतदारसंघ शिवसेना-भाजप किंवा श्रमजीवी संघटनेकडे जाईल अशी चर्चा सुरू असून श्रमजीवी संघटनेकडून स्वतः विवेक पंडित लढण्याची शक्यता आहे. 
         
सध्या या सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू असून वरिष्ठांकडे जे अंतर्गत सर्व्हे गेले आहेत त्याप्रमाणेच उमेदवारी घोषित होण्याची चिन्ह आहेत. पालघर लोकसभेतील या सहा विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र येत्या काळात कोणते उमेदवार निश्चित होतात आणि मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपलं बहुमूल्य मत टाकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.