Palghar Dahanu News:  डहाणू शहरातील (Dahanu City) नागरिकांसाठी सुजल निर्माण योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबवण्यात येत आहे. त्याचे काम अपूर्ण असताना 15 डिसेंबर रोजी या योजनेचे लोकार्पण पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. याकडे स्थानिक नागरिकांकडून लक्ष वेधण्यात येत असून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेय घेण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. 


अजूनही पाणीपुरवठा योजनेच्या कामात त्रुटी


डहाणू नगरपरिषद हद्दीतील वाढती लोकसंख्या आणि पाण्याचा तुटवडा लक्षात घेता 2014 मध्ये डहाणू शहरासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सुजल निर्माण योजनेअंतर्गत तब्बल 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून योजना राबवण्यात आली. या योजनेच्या काम कार्यादेश प्राप्त झाल्यानंतर 24 महिन्यांच्या आत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते पूर्ण न झाल्यामुळे त्याला वेळोवेळी  मुदतवाढ  देऊन शेवटी वाढीव निधीची तरतूद करण्यात आली होती. अखेर ते काम पूर्ण झाल्याची घोषणा डहाणू नगरपरिषदेकडून करण्यात येत आहे. मात्र, स्थानिकांच्या म्हणण्यानुसार अजूनही पाणीपुरवठा योजनेच्या कामात त्रुटी असून, संपूर्ण गावात पाणी पोहचण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगण्यात येत आहे. 


डहाणू शहरातील प्रभू पाडा, रामटेकडी, आंबेमोरा, मांगेलवाडा, आगर, डहाणू गावातील मशिदीच्या पाठीमागील भागात आणि अन्य काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत सुरू नसल्याचे सांगितले जात आहे. तर वडकून पांचाळ हॉलच्या पाठीमागे असलेली पाण्याची टाकी गळत असल्याचे दिसून आले आहे. संपूर्ण योजनेची तपासणी करताना जलकुंभ पूर्ण भरून ठराविक भागातील नगरसेवक व शेवटच्या उपभोक्ता यांच्या उपस्थितीत करण्याची अट असताना तसे करण्यात आले नसल्याची तक्रार जाणकारांनी केली आहे. असे असताना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना अपूर्ण असतानाच योजना पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आल्याचे आरोप करण्यात येत आहेत.


डहाणू नगरपरिषद अंतर्गत राबवण्यात आलेली ही योजना आठ वर्षांनंतरही अपूर्णच आहे. शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा कमी दाबाने आणि अपुरा होत असल्याचे आढळून आले आहे. असे असताना नगरपरिषद कडून पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्याची घोषणा करण्यात आल्यामुळे नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित राहत आहेत.


महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत सुजल निर्माण पाणीपुरवठा योजना डहाणू शहरासाठी राबवण्यात आली होती. या योजनेचे काम आराखड्याप्रमाणे पूर्ण झाले असून या बाबतचे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून नगरपरिषदेला प्राप्त झाले आहे. त्यानुसार या योजनेचे उद्घाटन करण्यात येत आहे. शहरातील काही ठिकाणी पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्या ठिकाणी उपाययोजना करून पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येईल.