पालघर : जिल्ह्यातील आरोग्यवस्थेचा ढिसाळ कारभार हा दिवसेंदिवस उघडा पडतोय. प्रसूती झालेल्या एका महिलेला आपल्या बाळांवर उपचार करण्यासाठी पालघरमधून थेट जव्हार असा 80 किलोमीटरचा प्रवास करावा लागला असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या सगळ्या प्रकारानंतर जिल्हा निर्मितीच्या दहा वर्षानंतरही पालघरमधील आरोग्यवस्था आजही खिळखिळी असल्याचं समोर आलं आहे. आरोग्य व्यवस्था सुधारण्यात राज्यकर्त्यांना अपयश येत असल्याचा आरोप आता केला जाऊ लागला आहे.
पालघर तालुक्यातील सफाळे जवळील नगावे येथील निकिता निलेश डगला या महिलेला प्रसुती कळा होऊ लागल्या. त्यानंतर या गरोदर महिलेला घेऊन कुटुंबीयांनी आधी मासवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर पालघर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. प्रसुतीनंतर निकिता यांना दोन जुळी मुलं झाली. मात्र या दोन्ही मुलांचं वजन कमी असल्यान्ं त्यांना जव्हार येथील विशेष नवजात शिशु देखभाल कक्षात रेफर करण्यात आलं.
पालघर जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या रुग्णालयात हा शिशु देखभाल कक्ष नसल्याने डगला कुटुंबीयांनी थेट 80 किलोमीटरचा प्रवास करत जव्हार रुग्णालय गाठलं. सध्या या दोन्ही शिशूंची प्रकृती स्थिर आहे. असं असलं तरी पालघरमध्ये आरोग्य व्यवस्था ढिसाळ असल्याचं या प्रकारानंतर पुन्हा एकदा समोर आला आहे.
दहा वर्षांनंतरही प्राथिक आरोग्य केंद्रात अधिकाऱ्यांचा अभाव
ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्यासाठी होणारी हेळसांड लक्षात घेऊन दहा वर्षांपूर्वी ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. मात्र दहा वर्षे उलटली तरीही आजही पालघर जिल्ह्यातील आरोग्यवस्था सक्षम झाली नसून आजही जिल्ह्याला सिविल रुग्णालय नाही. त्यातच मनोर येथे सुरू असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरच देखील काम मागील अनेक महिन्यांपासून रखडलं आहे. अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये देखील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अभाव पाहायला मिळतोय.
या सगळ्यामुळे मुंबई, ठाणे या महानगरालगत असलेल्या पालघर जिल्ह्यात आरोग्य विभागाचा उडालेला बोजवारा हा अनेकांच्या जीवावर बेतला आहे. पालघर जिल्ह्यात आजही आरोग्यवस्थेच्या अपुऱ्या सोयी सुविधा असल्याची कबुली खुद्द पालघर आरोग्य विभागाचे जिल्हा शल्य चिकित्सक रामदास मराड यांनी दिली आहे.
बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण वाढतेच
पालघर जिल्ह्यात आजही बालमृत्यू आणि माता मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मात्र प्रशासन आणि येथील राजकीय नेते हे या सगळ्यापासून अनभिज्ञ असल्याचं अनेक वेळा उघड झालं . पालघर जिल्ह्यात आरोग्य व्यवस्थेची सध्याची परिस्थिती ही गंभीर असल्याची कबुली देत खुद्द पालघरचे आमदार राजेंद्र गावित यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला आहे .
रुग्णालयांमध्ये सोयी सुविधांचा अभाव, अपुऱ्या रुग्णवाहिका, जिल्ह्यात 50 टक्क्यांहून अधिक रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा या सगळ्यामुळे पालघर जिल्ह्यातील आरोग्य विभाग नेहमीच चर्चेत असतो. त्यामुळे उपचार मिळत नसल्याने पालघर जिल्ह्यातील अनेक रुग्णांना थेट गुजरात आणि दादरा नगर हवेली सारख्या राज्यांचा आसरा घ्यावा लागतोय. मात्र यासाठी पालघर मधील रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठी पायपीट करावी लागत असल्यानं येथील आरोग्यवस्था सक्षम करण्यात सरकारनेच पुढाकार घ्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.