Ganeshotsav 2022: डहाणू तालुक्यातील कुणबी व आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेले डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य 'उर्से'  ह्या गावाने 'एक गाव, एक उत्सव' या माध्यमातून जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे. गणेशोत्सवाच्या संकल्पनेचा आदर्श ह्या गावाने राज्याला निर्माण करून दिला आहे.  
     
गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत असो किंवा गल्लोगल्ली असो. जिथं- तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात.  जिल्ह्यात घरोघरी दीड, अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच , सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना होते. मात्र 'एक गाव, एक गणपती' सारखी संकल्पना क्वचितचं काही ठिकाणी दिसून येते. अशीच 'एक गाव, एक गणपती'ची  संकल्पना पालघर जिल्ह्यातल्या एका गावानं गेल्या 50 वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे.


गावात एकच गणपती, घरगुती गणेशोत्सव नाही


गेल्या ५० वर्षापासून उर्से गावातील सर्व समाजाचे ग्रामस्थ एकत्र येत सार्वजनिक गणेशोत्सव ,सार्वजनिक गौरी उत्सव, नवरात्रोत्सव, गोपाळकाला यासह सर्व सण आनंदाने साजरे करत आहेत. साधारणपणे 2500 लोकसंख्या असलेल्या या गावातील 'एक गाव, एक गणपती' उत्सवाचे यंदाचे 50 वे वर्ष आहे. गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले जाते. ह्या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे हाच आदर्श ह्या गावाने जोपासला आहे. कोणत्याही घरी घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना केली जात नाही. संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येत सर्व उत्सव साजरे करतात. विशेष म्हणजे गावातील तरुण एकत्र येवून सजावट, आरास तयार करत असतात. येथे बनविण्यात येणारा आरसही पर्यावरणपूरक असतो. यावर्षीदेखील पर्यावरणपूरक देखावा तयार केला जात आहे. 


असा उभारतात खर्च


उर्से गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असून कोणत्याही प्रकारची देणगी गावाबाहेरून स्वीकारली जात नाही. सर्व आर्थिक खर्च गावकरीच गोळा करतात. या गावाने एक आपले स्वतःचे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे. गावाचे सर्व गावकरी येथेच आपले सर्व सण एकत्र साजरे करतात. तर, गावातील सर्व कामं ही श्रमदनातून केली जातात.  गणपती आणि गौरी विसर्जनानंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव करण्यात येतो. वस्तूंच्या लिलावातून आलेल्या पैसे गरजवंत असलेल्या शेतकऱ्यांना व्याजाने वाटप केले जाते. त्यानंतर पुढील वर्षी याच पैशांमधून सण साजरे केले जातात. दरवर्षी मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची बिनविरोधपणे निवड होते. गावात उत्सवाच्या ठिकाणी जुगार खेळणे, नशा करण्यास पूर्णपणे विरोध असतो. हे कृत्य करणाऱ्यास दंड आकारला जातो. येथे कोणताही पोलिस बंदोबस्त बोलाविला जात नसल्याचेही गावकऱ्यांनी सांगितले.