Dahanu Pattern for Accident Victim : पालघरच्या (Palghar) डहाणूसारख्या ग्रामीण भागात रुग्णालयांची कमतरता आणि वाढलेल्या रहदारीमुळे होणारे अपघात (Road Accident) या सगळ्यामुळे वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत अनेक राजकीय नेते आणि उद्योगपतींचे अपघात आपण पाहिले आहेत. यापैकी काहींना वेळेत उपचार न मिळाल्याने जीवही गमवावे लागले. मात्र अशाच रुग्णांना वेळेत प्रथमोपचार मिळावे म्हणून डहाणूत आता रस्त्यांवर 'डहाणू पॅटर्न' (Dahanu Pattern) राबवला जाणार आहे. डहाणू येथील डॉ. संजय सोहनी आणि त्यांच्या टीममार्फत राबवल्या जाणाऱ्या या पॅटर्नमध्ये डहाणूतील रिक्षाचालकांना (Auto Driver) तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रथमोपचाराचे धडे दिले जाणार (First Aid Lessons for Auto Drivers) असून यामुळे येथील रिक्षाचालक देवदूत ठरणार आहेत.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी 'डहाणू पॅटर्न'
मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्ग, पश्चिम रेल्वे, बुलेट ट्रेन, मुंबई - अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हे सगळे देशाला जोडणारे प्रकल्प पालघरमधील डहाणू तलासरीसारख्या ग्रामीण भागातून जात असून या ठिकाणी सध्या रहदारीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या परिसरात अपघातांची संख्या ही वाढली असून ग्रामीण भागात सुसज्ज अशी रुग्णालय नसल्याने अपघातांमध्ये जखमी झालेल्यांची मोठी गैरसोय झालेली दिसून येते. अनेक वेळा वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना आपला जीव ही गमवावा लागला आहे. त्यामुळे या भागात अपघातात होणाऱ्या जखमींच्या मदतीसाठी डहाणूतील ऑर्थोपेडिक डॉक्टर संजय सोहोनी आणि त्यांची टीम पुढे सरसावली आहे. डॉ. संजय सोहोनी आणि त्यांच्या टीमने या भागात डहाणू पॅटर्न नावाने एक अनोखा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे.
अपघातग्रस्तांचा जीव वाचवण्यात होणार मदत
ग्रामीण भागातील रस्त्यांवर रिक्षाचालक नेहमीच उपलब्ध असतात. त्यामुळे येथील रस्त्यावर एखादा अपघात घडलाच तर त्या ठिकाणी सर्वात आधी पोहोचणारी व्यक्ती ही बहुतांशी वेळा रिक्षाचालकच असते. त्यामुळे याच रिक्षाचालकांना आता अपघातग्रस्त जखमींवर प्रथमोपचाराचे धडे दिले जाणार आहेत. प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर डहाणूच्या डॉ. संजय सोहिनी यांनी ही संकल्पना अंमलात आणण्याचा निर्णय घेतला. डहाणूतील विविध तज्ज्ञ डॉक्टरांसह गुजरातच्या वापी येथील हरिया या नामांकित हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टर येथील रिक्षाचालकांना प्रथमोपचाराचे धडे देणार आहेत.
रिक्षाचालकांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून प्रथमोपचाराचे धडे
जखमीला कृत्रिम श्वासोत्सवास कसा द्यायचा, जखमेतून येणार रक्त कसं थांबवायचं, हाड किंवा डोक्याला मार लागला असेल तर जखमी व्यक्तीला कसं उचलायचं याची प्रात्यक्षिकं दाखवत प्रशिक्षण येथील रिक्षाचालकांना देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण घेणाऱ्या रिक्षाचालकांना बॅच आणि प्रमाणपत्र देखील देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णवाहिकेची वाट न पाहता रिक्षाचालकांनी पुढाकार घेतल्यास वर्षाकाठी अपघातातील किमान काही जखमींचा जीव नक्की वाचेल असा विश्वास डॉ. संजय सोहोनी यांनी व्यक्त केला आहे .
डहाणूत राबवला जाणारा हा डहाणू पॅटर्न यशस्वी ठरला तर सरकारने याचा विचार करून हा उपक्रम राज्यभर अंमलात आणावा अशी मागणी डहाणूतील डॉक्टरांकडून करण्यात आली आहे. तसेच अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या या रिक्षाचालकांना काही सवलती देता येतील का याचाही सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, असं देखील यावेळी या डॉक्टरांनी सांगितआलं आहे. मात्र सरकार याच्यावर अंमल करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.