पालघर : घाटकर पाडा याठिकाणी 1 एप्रिल रोजी एका तरूणीचा मृतदेह सुतळीच्या गोणीमध्ये भरून फेकलेला आढळून आला होता. त्याबाबत कोणताही पुरावा हाती नसताना पोलिसांनी त्या गोणीवरती लिहलेल्या 'एसएम 28' या मार्कवरून आरोपीचा शोध घेतला आहे. या प्रकरणात कारवाई करून आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. जव्हार-नाशिक रस्त्यावर वाघ नदीच्या पुलाखाली 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह गोणीत भरून फेकलेला पाच दिवसांपूर्वी आढळून आला होता. गुन्हेगारांनी कसलाही ठोस पुरावा मागे सोडला नसतानाही त्या गोणीवर निळ्या शाईने लिहिलेल्या 'एसएम 28' या एका मार्कवरून गुजरात, सिल्वासा असा शोध घेत स्थानिक गुन्हे शाखेने मोखाडा पोलिसांच्या मदतीने तरुणीच्या प्रियकरासह अन्य दोन आरोपींना अवघ्या तीन दिवसांत अटक केल्याची माहिती पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.
नेमकं काय प्रकरण?
घाटकर पाडा येथे 1 एप्रिल रोजी एका महिलेचा मृतदेह सुतळीच्या गोणीमध्ये भरून फेकलेला आढळून आल्याने खळबळ उडाली होती. कोणताही पुरावा नसतानाही पोलिसांनी मृतदेह भरलेल्या गोणीवर लिहिलेल्या 'एसएम 28' या मार्कच्या साह्याने आणि गोणीत सापडलेल्या मटारचे दाणे या पुराव्याच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांच्या टीमने नाशिक भाजी मार्केट येथे तपास सुरू केला. मटार हा सध्या मध्य प्रदेश व शिमला (हिमाचल प्रदेश) येथून महाराष्ट्रात येत असल्याची माहिती पोसिलांना मिळाली. पोलिसांनी थेट हिमाचल प्रदेश गाठून तेथील व्यापाऱ्याकडे माहिती घेतली असता हा माल वापी येथील होलसेल व्यापाऱ्यांकडे पाठवल्याची माहिती मिळाली. पुढे पोलिस तपास करत असताना त्यांना जास्त माहिती मिळाली नाही.
पोलिसांनी वापी मध्ये संपूर्ण माहिती घेतली असता हाती पुरेसा पुरावा न मिळाल्याने हा तपास थांबेल असं वाटत असतानाच मात्र, तलासरी पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार सुनील माळी यांना मृत महिला गुन्हा घडण्याच्या तीन दिवसांपूर्वी मुंबई-अहमदाबाद मार्गावरील महालक्ष्मी मंदिरात येऊन गेल्याची माहिती मिळाली आणि तपासाला वेग आला.
फिरायला गेल्यावर आवळला गळा
नेपाळमधील रहिवासी असलेली मृत मुलगी काजोल गुप्ता हिचे राजकुमार रासबिहारी वरही (वय 24) याच्याशी प्रेमसंबंध होते. आरोपी राजकुमारच्या घरातून काजोलला विरोध असल्याने तिचा काटा काढण्याच्या हेतूने आरोपी सुरेश सिंग (50, रा. सिल्वासा) याने एक कार भाड्याने घेतली. त्या भाड्याने घेतलेल्या कारमध्ये राजकुमार, काजोल आणि अन्य 3 आरोपी कारचालक बालाजी वाघमारे (30) हे सिल्वासा येथून महालक्ष्मी मंदिर डहाणू येथे आणि नंतर त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात फिरायला गेले होते. 1 एप्रिलच्या रात्री मोखाड्यातील जंगलात या आरोपीने काजोलचा स्कार्फने गळा आवळून तिला ठार मारले आणि कारमध्ये असलेल्या गोणीमध्ये बांधून मृतदेह पुलाखाली फेकून दिला होता.