मुंबई : पश्चिम रेल्वेच्या पालघर स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने अप आणि डाऊन दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे रेल्वेसेवा कोलमडली असून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम सुरू आहे. दरम्यान, बंद असलेल्या अजमेर एक्सप्रेसला डिझेल इंजिन जोडून पुढे पाठवण्यात आलं आहे. पश्चिम रेल्वेवरची वाहतूक सुरळीत होण्यासाठी रात्रीचे 12 वाजण्याची शक्यता आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या 11 नंतर तर गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या 12 वाजेनंतर सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रेल्वे खोळंबल्यामुळे रोरो सेवेवर परिणाम झाला असून, विरार ते सफाळे रोरो सेवा फुल्ल झाल्याचं दिसून आलं.
वांद्रे-अजमेर एक्सप्रेस पालघर रेल्वे स्थानकावर आल्यावर अचानक ओव्हरहेड वायर तुटली. त्यामुळे विरार ते डहाणू मार्गावरील रेल्वे सेवांवर त्याचा परिणाम झाला. विरार रेल्वे स्थानकात घरी जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली.
Bandra Ajmer Express Overhead Wire Breaks : रोरो सेवेची वेळ वाढवली
माजी आमदार हितेंद्र ठाकुर यांच्या विनंतीवरुन सुवर्णंदुर्ग शिपिंग आणि मरीन सर्व्हिसेस प्रा. लिमिटेड या कंपनीने आपल्या शेवटच्या फेरीची वेळ वाढवली. ट्रेन बंद असल्याकारणाने शेवटची फेरी बोट ही 10:10 वरून 12:00 वाजेपर्यंत करण्यात आली. तर एसटी महामंडळानेही पालघर, सफाळे, डहाणूपर्यंत अधिक बसेस सोडण्यात येत आहेत. दरम्यान पालघर बोईसर आणि सफाळे या बस स्थानकातून बस सोडण्यासाठी संबंधित प्रशासनाशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत सावरांनी दिली.
Western Railway Traffic Disrupted : पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली
पालघर रेल्वे स्थानकाजवळ तुटलेल्या ओव्हरहेड वायर दुरुस्तीचं काम वेळेपर्यंत सुरू असल्याने पश्चिम रेल्वेवरच्या लोकल वाहतुकीचा खोळंबा झाल्याचं दिसून आलं. त्यामुळं मुंबईहून होऊन पालघर आणि गुजरातच्या दिशेनं येणारे प्रवासी विरार रेल्वे स्थानकावर अडकून पडले. तसंच पालघरहून मुंबईच्या येणारे प्रवासीही वेगवेगळ्या स्थानकांवर अडकून पडले.
ही बातमी वाचा: