Ashok Dhodi Case : पालघर जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी (Ashok Dhodi) यांच्या अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धोडी (Avinash Dhodi) याला अखेर पालघर पोलिसांनी (Palghar Police) जेरबंद केले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून फरार असलेल्या अविनाश धोडीचा शोध सुरू होता.

अविनाश धोडी याला दादरा नगर हवेली परिसरातून अटक करण्यात आली असून, ही कारवाई पालघर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. अशोक धोडी यांच्या अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली होती. तपासात अविनाश धोडी मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले होते. मात्र घटनेनंतर तो फरार झाला होता.  

अविनाश धोडी याच्या तपासासाठी पालघर पोलिसांनी विशेष पथक नेमले होते. पाच महिन्यांच्या शोध मोहिमेनंतर अखेर आरोपी अविनाश धोडी पोलिसांच्या जाळ्यात सापडला आला. त्याला दादरा नगर हवेली परिसरातून अटक करण्यात आली असून त्याची पोलीस सखोल चौकशी करत आहेत. 

नेमकं प्रकरण काय? 

शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी हे जानेवारी महिन्यात कामानिमित्त डहाणू येथे आले होते. त्यांनी आपली कार डहाणू येथे पार्क करून रेल्वेने मुंबईकडे प्रयाण केले होते. 20 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास ते डहाणू रेल्वे स्थानकात परतले आणि बोर्डी-बोरीगावमार्गे वेवजी येथे घरी जाण्यासाठी निघाले. मात्र, ते कधीच घरी पोहोचले नाहीत. त्यानंतर अशोक धोडी आणि त्यांची कार दोघेही बेपत्ता झाले.

अशोक धोडी बेपत्ता झाल्यानंतर आठवडाभराच्या तपासानंतर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, 31 जानेवारी रोजी गुजरातमधील सरीगाम येथील एका बंद खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह त्यांच्या कारच्या डिकीत सडलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणाने खळबळ उडाली होती. तपासाच्या दरम्यान पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. मात्र या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार अविनाश धोडी हा वेवजी येथील पोलीस चौकीतून पळून गेला. त्याच्यासह मनोज राजपूत आणि आशीष धोडी-पटेल हे दोघेही फरार होते.

या आरोपींचा ठावठिकाणा मिळविण्यात पोलिसांना यश येत नव्हते. शेवटी, 29 मे रोजी झालेल्या सुनावणीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी थेट गुन्हेगारी वॉरंट जारी करून आरोपींना 21 जून रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आता या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी अविनाश धोडी याला पालघर पोलिसांनी अखेर अटक केली आहे.

आणखी वाचा

Beed Crime : अपहरणाचा कट उधळला, हिंगोलीतील व्यक्तीची बीडमध्ये पोलिसांकडून सुटका; महिलेसह दोघांना बेड्या, नेमकं काय घडलं?