Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याशी (Pahalgam Terror Attack) संबंधित एफआयआर एबीपी 'माझा'च्या हाती लागला आहे. या एफआयआरमध्ये हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. 22 एप्रिलला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी सुरु झालेला हल्ला 2 वाजून 20 मिनिटांपर्यंत सुरु होता. हल्ल्यानंतर 10 मिनिटांत म्हणजे दुपारी अडीच वाजता एफआयआर दाखल झाला. दहशतवाद्यांना पाकस्थित सूत्रधारांकडून सूचना मिळत होत्या, असंही एफआयआरमध्ये म्हटलंय. हल्ल्यासाठी बेकायदेशीरपणे मिळवलेले ऑटोमॅटिक हत्यारे वापरण्यात आली. दहशतवाद्यांविरुद्ध यूएपीए आणि बीएनएसनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान पोलिसांच्या एफआयआरसह सर्व तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांचा एफआयआर हा मूळ आधार मानून एनआयएकडून तपास सुरु आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं संपूर्ण देश हादरला. 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणाचा तपास आताएनआयएकडून करण्यात येत आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. दहशतवादी पहलगाममध्ये 2-3 दिवस आधीच दाखल झाले होते. 20 आणि 21 तारखेला पाऊस पडल्यानं पहलगाममध्ये पर्यटक संख्या कमी होती. 22 तारखेला पाऊस नसल्यानं पर्यटक वाढले आणि दहशतवाद्यांनी हल्ला केला. बैसरनमध्ये पाऊस पडल्यानं दोन दिवस हल्ला लांबला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

दहशतवाद्यांनी चार वेगवेगळ्या ठिकाणांची केली होती रेकी-

पहलगाम हल्ल्याच्या एक आठवड्याआधी दहशतवाद्यांनी चार वेगवेगळ्या ठिकाणांची रेकी केली होती. दहशतवाद्यांनी सुरुवातीला पहलगामच्या आरु खोऱ्याची पाहणी केली होती. परंतु सुरक्षा जास्त असल्याने ती जागा फेटाळली. यानंतर आरु खोऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अम्युझमेंट पार्कची पण रेकी करण्यात आली. पण इथे गर्दी कमी असल्याने त्यांनी हल्ला करण्याचं टाळल्याचंही समोर आलं आहे. 

भारताला पाकिस्तानकडून अणूहल्ल्याची धमकी-

घाबरलेल्या पाकिस्तानने सलग सातव्या दिवशी सीमेवर गोळीबार केला. पाकिस्तानी लष्कराने एलओसीवर कुपवाडा, ऊरी, अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला. संपूर्ण रात्रभर पाकिस्तानी गोळीबार सुरू होता. त्याला भारतानेही तोडीस तोड उत्तर दिलं. भारताने पाकिस्तानच्या गोळीबाराला भडीमाराने उत्तर दिलं. भारतीय हल्ल्याच्या धमकीमुळे पाकिस्तानमध्ये घबराट निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी पुन्हा एकदा भारताला अणूहल्ल्याची धमकी दिली. भारताच्या आक्रमकतेला आम्ही जोरदार प्रत्युत्तर देऊ, असं इशाक दार म्हणाले.

संबंधित बातमी:

Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानच्या पंतप्रधानांना सुनावले खडेबोल; म्हणाले, आम्ही भारतासोबत, तुम्ही पहलगाम हल्ल्याचा निषेध करा!

Pahalgam Terror Attack: नि. मेजर जनरलचं मोठं भाकीत, मोदी पाकिस्तानचे दोन तुकडे पाडणार, सर्जिकल स्ट्राईकपेक्षा भयंकर हल्ल्याची तयारी!