Pahalgam Terror Attack: जम्मू-काश्मीरमधील 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terror Attack) प्राथमिक तपास अहवाल एनआयएने तयार केला आहे. एनआयएच्या तपास अहवालात पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर, आयएसआय आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या कटाचे पुरावे सापडले आहेत. बेताब खोऱ्यात दहशतवाद्यांनी त्यांचे शस्त्रे लपवल्याचे तपासात उघड झाले. दहशतवादी हल्ल्यात OGW च्या भूमिकेचा उल्लेख देखील करण्यात आला आहे. एनआयएने ओव्हरग्राउंड कामगारांच्या संपर्कांची यादी तयार केली. ओजीडब्ल्यू विरुद्ध प्रशासकीय आणि न्यायालयीन कारवाईची तयारी सुरू आहे.
प्राथमिक तपास अहवालात हल्ल्यात सहभागी असलेल्या दोन दहशतवाद्यांचा उल्लेख आहे. हाश्मी मुसा आणि अली भाई उर्फ तल्हा भाई या नावाचा समावेश आहे. हाश्मी मुसा आणि तल्हा भाई हे पाकिस्तानचे नागरिक आहेत, दहशतवादी पाकिस्तानी हँडलर्सच्या संपर्कात होते. पाकिस्तानकडून मार्गदर्शक सूचना मिळत होती. आयएसआयच्या आदेशावरून लष्करच्या मुख्यालयात पहलगाम हल्ल्याबाबत कट रचण्यात आला होता. त्यामुळे पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भारताकडून अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी-
पाकिस्तान कसा घाबरला आहे याचे पाच पुरावे काल एबीपी माझानं प्रेक्षकांना दाखवले आणि त्यात आता आणखी एकाची भर पडली आहे. बिथरलेल्या पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमधल्या मदरशांना 10 दिवसांची सुट्टी दिली आहे. नरेंद्र मोदी आणि हवामान अशा दोन आव्हानांचा आम्ही सामना करतोय, असं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या धार्मिक विभागाचे प्रमुख हाफिज नजीर अहमद यांनी दिलं आहे.
हल्ल्यासाठी बेकायदेशीरपणे मिळवलेले ऑटोमॅटिक हत्यारे वापरली-
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर एबीपी 'माझा'च्या हाती लागला आहे. या एफआयआरमध्ये हल्ल्याचा तपशीलवार घटनाक्रम नमूद करण्यात आला आहे. 22 एप्रिलला दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी सुरु झालेला हल्ला 2 वाजून 20 मिनिटांपर्यंत सुरु होता. हल्ल्यानंतर 10 मिनिटांत म्हणजे दुपारी अडीच वाजता एफआयआर दाखल झाला. दहशतवाद्यांना पाकस्थित सूत्रधारांकडून सूचना मिळत होत्या, असंही एफआयआरमध्ये म्हटलंय. हल्ल्यासाठी बेकायदेशीरपणे मिळवलेले ऑटोमॅटिक हत्यारे वापरण्यात आली. दहशतवाद्यांविरुद्ध यूएपीए आणि बीएनएसनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.